Advertisement
Railwayअर्थकारणआरोग्यजळगावमहाराष्ट्रमुंबई

भुसावळ: सेंट्रल रेल्वे मजदूर संघाची मंडळस्तरीय परिषद डॉ प्रवीण बाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत्या संपन्न

भुसावळ : दि-07/01/2025, भुसावळ येथील मुख्य शाखेत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या मंडळस्तरीय महत्वपूर्ण परिषदेचे आयोजन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष तथा संयुक्त महामंत्री (एनएफआयआर), राष्ट्रीय सचिव (आयएनटीयूसी) डॉ. प्रवीण बाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न झाली.
डॉ. बाजपेयी यांनी आपल्या संबोधनात मध्य रेल्वेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रशासकीय कामांसह कामाच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी संघटना नेहमी प्राधान्य देत असल्याचे सांगितले. यापुढेही डीआरएम यांना वेळोवेळी निवेदने देऊन या समस्या सोडवण्यासाठी संघटना कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, ही परिषद वर्षातून चार वेळा आयोजित केली जाते. झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (झेआरटीआय) येथे अन्नपूर्णा खानावळीत दूषित अन्नामुळे सुमारे १५० प्रशिक्षणार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्याच्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख करत डॉ. बाजपेयी यांनी खानावळीच्या पर्यवेक्षण समितीच्या निष्काळजी कार्यपद्धतीचा समाचार घेतला. या घटनेनंतर संघटनेने तात्काळ आवाज उठवला होता आणि यापुढेही कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविरोधी अशा घटनांविरुद्ध संघटना सतत आवाज उठवत राहील, असेही त्यांनी सभेत स्पष्ट केले आहे.


तसेच, ड्यूटीदरम्यान दुर्दैवाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना संघटनेकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या क्रेडिट सोसायटीबाबत बोलताना ते म्हणाले की, सध्या तेथे संघटनेची सत्ता नसली तरी लवकरच सत्ता प्राप्त होईल आणि त्यानंतर कर्ज वितरण प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन करण्यात येईल, जेणेकरून कर्मचाऱ्यांना जलद व सुलभ कर्ज मिळेल.


झेआरटीआय येथील विषबाधा घटनेबाबत तसेच पाऊस ग्राउंड ट्रान्सफर आणि कर्मचाऱ्यांना रिलीव्ह करण्याच्या मुद्द्यांवर डॉ. बाजपेयी यांनी डीआरएम पुनित अग्रवाल व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा केली आहे.
आजच्या परिषदेला मुख्यालय उपाध्यक्ष व्ही. के. समाधीया, मंडळ अध्यक्ष मोहम्मद इरफान, मंडळ सचिव एस. बी. पाटील, शाखा अध्यक्ष भूपेंद्र निळकंठ, शाखा सचिव महिंद्र सपकाळे, भुसावळ झोनल कारखाना सचिव तथा ईसीसी डेलिगेट किशोर कोलते, पीओएच सचिव अजित अमोदकर यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button