Advertisement
जळगावनिवडणूकमहाराष्ट्रमुंबईराजकीय

जनविश्वासाचा महाविजय; नंदकिशोर महाजनांचा विक्रमी ५६५ मतांनी दणदणीत विजय, जळगावच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय

मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातून चौथे लोकप्रतिनिधी

जळगाव : प्रतिनिधी — जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार तथा शेतकरीपुत्र नंदकिशोर (नंदूभाऊ) महाजन यांनी ऐतिहासिक आणि दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांचा तब्बल ५६५ मतांच्या फरकाने पराभव केला. अधिकृत मतमोजणी अहवालानुसार नंदकिशोर महाजन यांना ५८२ मते, तर शरद तायडे यांना १७ मते मिळाली. त्यामुळे त्यांच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले असून जळगावच्या राजकीय इतिहासात नव्या अध्यायाची नोंद झाली आहे.
अधिकृत मतमोजणीतील आकडेवारी
मतमोजणीसाठी तीन टेबलांवर प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये —
नंदकिशोर भागवत महाजन : टेबल क्र. १ वर २०७, टेबल क्र. २ वर १९१ आणि टेबल क्र. ३ वर १८४ अशी एकूण ५८२ मते
शरद शामराव तायडे : ३, ४ आणि १० अशी एकूण १७ मते
अनिल छबिलदास चौधरी : एकूण ११ मते
रेश्मा कुंदन काळे : १ मत
एकूण ६११ वैध मते, तर ५ अवैध मते नोंदविण्यात आली.
कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडत असताना काही मतांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. मात्र अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या निकालात नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय स्पष्ट झाला.
ना. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची एकजूट
या निवडणुकीत राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नेतृत्व केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, मंगेश चव्हाण, अमोल जावळे, किशोर आप्पा पाटील, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकदिलाने काम करत विजयासाठी भक्कम वातावरण निर्माण केले.
बैठका, समन्वय आणि संघटनशक्ती ठरली निर्णायक
निवडणुकीच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या बैठका, समन्वय मेळावे, मतदार संपर्क अभियान आणि प्रभावी संघटनात्मक नियोजनामुळे महायुतीची ताकद अधिक प्रभावीपणे समोर आली. नगरपालिकांपासून महानगरपालिकांपर्यंत कार्यकर्त्यांनी दाखविलेली एकजूट या निकालातून अधोरेखित झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शासनव्यवस्थेवर स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेला विश्वासही या निकालातून स्पष्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
निष्ठा, संयम आणि स्पष्टवक्तेपणाची मिळाली पावती
राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून एकाच पक्षाशी निष्ठा ठेवणारे, संयमी आणि स्पष्टवक्ते नेतृत्व म्हणून नंदूभाऊ महाजन यांच्याकडे पाहिले जाते. “माणुसकी हाच धर्म आणि माणूस हीच जात” ही भूमिका स्वीकारत त्यांनी सार्वजनिक जीवनात जाती-पातीच्या राजकारणाला कधीही स्थान दिले नाही. कार्यकर्ते, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांशी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध त्यांच्या विजयामागील महत्त्वाचे कारण मानले जात आहे.
शेतकरीपुत्राची विधान परिषदेत दमदार एंट्री
जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना नंदकिशोर महाजन यांनी ग्रामीण विकासाची कास धरली. तापी, पूर्णा आणि गिरणा खोऱ्यातील शेतकरी समाजासाठी ते आशेचा नवा किरण ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मतदार असलेले नंदूभाऊ महाजन हे या भागातून विधान परिषदेत पोहोचणारे तिसरे प्रतिनिधी ठरणार आहेत. यापूर्वी एकनाथ खडसे विधान परिषदेत गेले होते, तर चंद्रकांत पाटील विधानसभा सदस्य आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे याही याच मतदारसंघातील मतदार असल्याने हा विशेष योगायोग मानला जात आहे.
तांदलवाडी गावाला पुन्हा मिळाला आमदारपदाचा मान
नंदकिशोर महाजन यांच्या विजयामुळे तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा आमदारपदाचा मान मिळाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून यावेळी ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातून आलेल्या नेतृत्वाला संधी मिळाल्याने जिल्ह्याच्या प्रश्नांना अधिक प्रभावी आवाज मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जळगावमध्ये महायुतीचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित
नंदकिशोर महाजन यांना मिळालेली ५८२ मते आणि प्रतिस्पर्धी शरद तायडे यांना मिळालेली १७ मते, यामुळे ५६५ मतांची अभूतपूर्व आघाडी नोंदवली गेली. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. निकाल जाहीर होताच जिल्हाभरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप आणि जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला.
इतिहास घडवणारा विजय
नंदकिशोर महाजन यांच्या या दणदणीत विजयाने जळगाव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला असून, हा विजय महायुतीच्या एकजुटीचा, विकासाभिमुख राजकारणाचा, शेतकरीपुत्राच्या संघर्षाचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या विश्वासाचा महाविजय ठरल्याची भावना जिल्हाभरातून व्यक्त होत आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp