भुसावळ नगरपालिकेची उद्याची होणारी सभा तूर्त तहकूब; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी काढली नोटीस ! वारंवार स्थगितीवर जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी होणार सुनावणी
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार सुनावणी

भुसावळ, दि.-२२/०३/२०२६ : भुसावळ नगरपरिषदेची २३ मार्च रोजी होणारी सर्वसाधारण सभा तूर्त एकदा तहकूब करण्यात आली आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी अधिकृत नोटीस काढत सभेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले. मात्र, या निर्णयामागील कारण अधिकृतरीत्या सांगण्यात आलेले नसले तरी पालिकेतील सत्ताधारी-विरोधकांतील वाढता संघर्ष आणि सततचे वाद हेच मुख्य कारण असल्याची चर्चा आहे.
पालिकेच्या सभागृहात मागील दोन बैठकीत जोरदार गदारोळ, शाब्दिक चकमकी आणि धक्काबुक्कीचे प्रकार घडले होते. ‘लाडका नगरसेवक’ योजनेसह विविध विकासकामांवरूनही वातावरण तापले होते. परिणामी, निवडणुकीनंतरच्या अनेक सभा वादग्रस्त ठरल्या असून काही वेळा त्या तहकूब करण्याची वेळ आली आहे. सोमवारी होणारी सभा रद्द झाल्याने शहरातील विकासकामे, बजेट मंजुरी आणि प्रभागनिहाय प्रस्ताव रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या सभेत नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी कोणतेही अधिकृत कारण न देता पत्रकारांना प्रवेश नाकारला होता. आता सभा तहकूब करण्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले असून नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी पत्रकारांना पत्रकार परिषद घेऊन याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तसेच त्यांचे पती चेतन भंगाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते बाहेरगावी असून ताईंशी बोलल्यानंतर कळवणार आहे.
दरम्यान, वारंवार सभा तहकूब केल्या जात असल्याच्या तक्रारीवरून आता प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात पोहोचले आहे. भाजपच्या २५ नगरसेवकांनी महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम ३०८ अंतर्गत अपील दाखल केले असून त्यावर २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे. या प्रकरणी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने भाजपच्या सर्व नगरसेवकांना नोटीस बजावून वैयक्तिक किंवा वकिलामार्फत सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. गैरहजर राहिल्यास एकतर्फी निर्णय घेतला जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. मुख्याधिकाऱ्यांना नोटीस तात्काळ बजावून त्याची पोहोच सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नगरपालिकेतील वारंवार होणाऱ्या तहकूब बैठका, सत्तासंघर्ष आणि प्रशासकीय अडचणी यामुळे आता हा वाद थेट जिल्हा न्यायदंडाधिकारी पातळीवर पोहोचला आहे. २४ मार्चच्या सुनावणीत जिल्हाधिकारी काय काय निर्णय देणार, याकडे सुज्ञ भुसावळकरांचे लक्ष लागलेले आहे. या निर्णयानंतरच नगरपालिकेची पुढील सर्वसाधारण सभा आयोजित केली जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.












