भुसावळ:कन्हाळा गावालगत खडका औद्योगिक वसाहतीच्या जमिनीवर मुरूम माफियांचे राजरोसपणे अवैध उत्खनन सुरू
माती उत्खननाचा "रात्रीस खेळ चाले"

भुसावळ, दि.-01/02/2026, भुसावळ तालुक्यातील कन्हाळा गावाजवळील खडका औद्योगिक वसाहतीच्या (औद्योगिक क्षेत्र) मालकीच्या जमिनीवर मुरूम माफियांच्या टोळीने राजरोसपणे अवैध माती उत्खनन सुरू केले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हे गंभीर प्रकार सुरू असून, महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून जेसीबी व पोकलेन मशिन्सच्या साहाय्याने मुरूम (माती) चोरी होत आहे. आतापर्यंत अंदाजे २००० ब्रास मुरूम अवैधरित्या चोरून नेल्याची माहिती आहे.

या परिसरात भुसावळ तहसीलदारांनी नेमलेले गस्ती पथक दररोज ‘भरारी’ (पेट्रोलिंग) घेत असते. तरीही कन्हाळा गावातून किन्ही गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगतच हे खोदकाम आणि माती चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात येत नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणी संबंधित तलाठी यांना विचारणा केली असता, त्यांनी याबाबत पूर्ण अनभिज्ञता दाखवली.
मंडळाधिकारी प्रविण पाटील यांना संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, “ती जमीन औद्योगिक वसाहतीच्या मालकीची असून, तिची सुरक्षा करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे”. मात्र, या अवैध उत्खननामुळे शासनाच्या बुडणाऱ्या रॉयल्टीबाबत विचारणा केल्यावर त्यांनी फोन कट केला.
दुसरीकडे, भुसावळ तहसीलदार निता लबडे यांना यासंदर्भात विचारले असता, त्यांनी सांगितले की, औद्योगिक वसाहतीच्या प्रतिनिधीला या जमिनीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजना करण्याचे पत्र पूर्वीच देण्यात आले आहे. तरीही रॉयल्टी वसुली किंवा अवैध उत्खनन रोखण्याबाबत कोणतेही ठोस आदेश किंवा कारवाई दिसून येत नाही.
रस्त्याच्या कामासाठी वापरली जातेय माती
या परिसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी ही चोरलेली माती वापरली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या अवैध मुरूम उत्खननामुळे शासनाच्या महसूलाचे मोठे नुकसान होत असून, पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही हा गंभीर प्रकार आहे. स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी त्वरित कारवाईची मागणी केली असून, आता जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून काय कार्यवाहीचे आदेश दिले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकारामुळे भुसावळ तालुक्यातील गौण खनिज तस्करी आणि माफियांच्या मुजोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












