Advertisement
अर्थकारणक्राईम/कोर्टजळगाव

भुसावळात एसीबीची मोठी कारवाई, सावकारी परवान्यासाठी ३० हजारांची लाच,सहकार अधिकारीसह दोन लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

सहकार क्षेत्राला पुन्हा लागली भ्रष्टाचाराची किड

भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करणारी धक्कादायक घटना भुसावळात उघडकीस आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सहकार विभागातील अधिकारी आणि त्यांच्याशी संबंधित खासगी लेखापरीक्षक यांच्या संगनमतातून सावकारी व्यवसायाचा परवाना देण्यासाठी तब्बल ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धाडसी कारवाई करत सहकार अधिकारी आणि दोन प्रमाणित लेखापरीक्षकांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू केली आहे. गेल्या महिन्यात खाजगी सावकाराला कथित गुन्ह्यांपासून वाचविण्यासाठी लाखांची लाच घेताना एक सहाय्यक उपनिबंधक जाळ्यात अडकला होता. त्याच्या भुसावळ शहरातील कॉसमॉस बँकेतील लॉकर मध्ये दीड कोटींचे सोन्याचांदीचे घबाड सापडले होते ,त्याचीही आता चौकशी सुरू आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील एका नागरिकाने सावकारी व्यवसायासाठी आवश्यक परवाना मिळविण्याच्या उद्देशाने ३० मार्च २०२६ रोजी सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, भुसावळ येथे अर्ज दाखल केला होता. मात्र, संबंधित काम मंजूर करून देण्यासाठी सहकार अधिकारी विजय विनायक गरुड (वर्ग-३) यांनी थेट लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी तक्रारदाराला प्रमाणित लेखापरीक्षक सुरेश जनार्दन विसपुते यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले होते.
या संदर्भात तक्रारदाराने २३ एप्रिल २०२६ रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये सुरेश विसपुते यांनी केवळ सहकार अधिकारी विजय गरुड यांच्यासाठीच नव्हे, तर स्वतःसाठी आणि आणखी एक प्रमाणित लेखापरीक्षक हेमंत प्रकाश काळे यांच्यासाठी मिळून एकूण ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर १५ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली परिसरात सापळा रचला. या कारवाईदरम्यान सुरेश विसपुते यांनी तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारली. तपासादरम्यान या रकमेपैकी पाच हजार रुपये सहकार अधिकारी विजय गरुड यांच्या मागणीनुसार फोन-पेच्या माध्यमातून पाठविण्यात आल्याचे उघड झाले. तसेच हेमंत काळे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून लाच रक्कम स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचेही तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७, ७-अ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, बाजारपेठ पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सहकार विभागात दलालांचे जाळे सक्रिय?
या कारवाईमुळे सहकार विभागातील कामकाजाविषयी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना परवाने, नोंदणी किंवा इतर मंजुऱ्या मिळविण्यासाठी अधिकृत प्रक्रियेपेक्षा काही विशिष्ट लेखापरीक्षक, एजंट किंवा मध्यस्थांच्या माध्यमातूनच कामे करावी लागत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही वारंवार समोर आल्या आहेत. त्यामुळे ही घटना केवळ तीन व्यक्तींपुरती मर्यादित नसून, सहकार क्षेत्रात खोलवर रुजलेल्या ‘दलाल संस्कृती’ च्या भ्रष्ट साखळीचे हे एक उदाहरण असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पूर्वी मंजूर झालेल्या परवान्यांची चौकशी होणार का?
या प्रकरणानंतर भुसावळसह जळगाव जिल्ह्यात यापूर्वी मंजूर झालेल्या सावकारी परवान्यांची सखोल चौकशी होणार का, अशाच प्रकारे किती नागरिकांकडून पैशांची उकळपट्टी करण्यात आली, तसेच या व्यवहारामागे आणखी कोणते अधिकारी किंवा मध्यस्थ सक्रिय होते का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या सहकार क्षेत्रातच भ्रष्टाचाराचे जाळे निर्माण होत असेल, तर शासन व्यवस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केवळ रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तिघांपुरती कारवाई न करता, या संपूर्ण रॅकेटची चौकशी करून संबंधित सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.या सापळा पथकात पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलिस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते.
पुढील तपास पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे या करीत आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp