Advertisement
आरोग्यजळगाव

हतनूर धरणातून 2 दरवाजे उघडून तापीनदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू; भुसावळची चिंता मिटणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

रावेर तालुक्यासह बऱ्हाणपूर, बुलढाणा जिल्ह्यात दमदार पाऊस

भुसावळ, दि. 28 जून : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर तसेच बुलढाणा जिल्हा आणि रावेर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी सुरू झालेल्या दमदार पावसामुळे हतनूर धरणातील पाण्याची आवक वाढल्याने आज रविवारी रात्री धरणातून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यंदा पहिल्यांदाच हे दरवाजे उघडून तापीनदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याने भुसावळकरांच्या पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र उद्या परवा पर्यंत गाळयुक्त पाणी पुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे. विशेष म्हणजे भुसावळ तालुक्यात जून महिन्यात पावसाने दांडी मारलेली आहे.

धरण प्रशासनाने रात्री 9.00 वाजता जाहीर केलेल्या माहितीनुसार, हतनूर धरणाची सध्याची पाणीपातळी 211.510 मीटर इतकी असून, धरणाची पूर्ण जलसाठा पातळी (FRL) 214.000 मीटर आहे. धरणात सध्या 257.50 दशलक्ष घनमीटर (Mm³) म्हणजे 66.37 टक्के एकूण जलसाठा असून, उपयुक्त (लाईव्ह) जलसाठा 124.50 दशलक्ष घनमीटर (48.82 टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे.

सध्या धरणाचे दोन रेडियल गेट प्रत्येकी 0.5 मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 72.0 क्युमेक्स (2,543 क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कालव्यातून 0.71 क्युमेक्स (25 क्युसेक) पाणी सोडण्यात येत आहे. आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

धरण परिसरात रविवारी 6 मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान 34 मिमी इतके झाले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने पुढील काही तासांत विसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यापूर्वी दुपारी 4.00 वाजता धरण प्रशासनाने पूर सतर्कता (Flood Alert) जारी करत तापी व पूर्णा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातून पुढील काही तासांत पाण्याचा विसर्ग करण्यात येण्याची शक्यता असल्याचे सांगत नदीपात्रात किंवा नदीकाठावर अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदीकाठावरील कमी उंचीच्या भागात जाणे टाळावे, जनावरे व शेतीसंबंधी साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. तसेच नदीपात्रात मासेमारी, पोहणे किंवा इतर कोणतीही धोकादायक हालचाल करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp