Advertisement
क्राईम/कोर्टजळगावराजकीय

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मे दरम्यान कलम 37(१) लागू ; काही ठिकाणी ५ पेक्षा अधिक लोकांचा जमाव जमवण्यासाठी एसपींची पूर्वपरवानगी आवश्यक

जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी) — सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी, तसेच जिल्ह्यातील आगामी सण-उत्सव, विविध थोर व्यक्तींच्या जयंती-पुण्यतिथी आणि संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले असून, १५ मे २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते २९ मे २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत ते संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहेत.
अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, या कालावधीत जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीस शस्त्रे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड किंवा तत्सम वस्तू जमा करणे, सार्वजनिक ठिकाणी उत्तेजक घोषणा देणे, आक्षेपार्ह हावभाव करणे, तसेच कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिमांचे दहन करणे यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
याशिवाय, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव जमविण्यासाठी पोलीस अधीक्षकांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवानगीशिवाय कोणतीही सभा, मोर्चा किंवा मिरवणूक काढण्यास मनाई असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
तथापि, शासकीय कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ, प्रेतयात्रा यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच, कर्तव्य बजावताना शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे.
जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून कोणत्याही अफवा किंवा अनुचित प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp