Advertisement
क्राईम/कोर्टजळगावराजकीय

BNA च्या अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे भीषण अपघात ; २ जण जागीच ठार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ

मुक्ताईनगर | दि. १३ मे २०२६, मुक्ताईनगर ते बुरहानपूर रोडवरील स्मशानभूमीजवळ मंगळवारी (दि. १२) रात्री सुमारे ११:४५ वाजता झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बी.एन. अग्रवाल कंपनीने रात्रीच्या वेळी नियमबाह्यपणे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर (क्रमांक १८६२) ने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावर न थांबता पलायन केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात FIR क्र. ०२०८/२०२६ दाखल करण्यात आली असून अज्ञात डंपर चालकाविरुद्ध BNS व मोटार वाहन कायद्यान्वये गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
घटनेचा सविस्तर तपशील
तक्रारदार गोपाल ओंकार बोरेला (वय ४२, रा. श्री कॉलनी, मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा राजकुमार गोपाल बोरेला आणि त्याचा मित्र राहुल गणपत ठाकुर (वय १९) हे काळ्या रंगाच्या मोटरसायकलने (MP 68 ZD 8160) गावात फेरफटका मारून घरी परतत होते.
रात्री अंदाजे ११:४५ वाजता मुक्ताईनगर-बुरहानपूर मार्गावरील स्मशानभूमीजवळ समोरून आलेल्या पिवळ्या रंगाच्या डंपरने (बी.एन. अग्रवाल १८६२) भरधाव वेगात व निष्काळजीपणे मोटरसायकलला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने अॅम्बुलन्स बोलावून सरकारी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
साक्षीदाराने पाहिला BNA चा डंपर
घटनास्थळाजवळ समाधीजवळ झोपलेले नारायण झांबे यांनी जोरदार आवाज ऐकून बाहेर येताच एक पिवळ्या रंगाचा डंपर पाण्याच्या टाकीकडे वेगाने जाताना पाहिला. त्यांनी डंपरवर “B.N. Agrawal 1862” असा क्रमांक स्पष्टपणे पाहिल्याचे पोलिसांना सांगितले.
लागू करण्यात आलेली कायदेशीर कलमे व त्यांचा अर्थ
1) BNS कलम 106(1) – निष्काळजीपणामुळे मृत्यू
एखाद्याच्या निष्काळजी किंवा अविचारी कृत्यामुळे मृत्यू झाल्यास लागू. या प्रकरणात: चालकाच्या बेफिकीर वाहनचालकामुळे दोन तरुणांचा मृत्यू.
2) BNS कलम 281 – सार्वजनिक रस्त्यावर रॅश ड्रायव्हिंग धोकादायक किंवा बेदरकार पद्धतीने वाहन चालवणे.
3) BNS कलम 324(4) – मालमत्तेचे नुकसान
या प्रकरणात: मोटरसायकलचे गंभीर नुकसान.
4) मोटार वाहन कायदा कलम 184 – सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणारी वाहनचालकाची कृती.
5) मोटार वाहन कायदा कलम 134(B) – अपघातानंतर चालकाचे कर्तव्य, अपघातानंतर जखमींना मदत करणे, रुग्णालयात नेणे, पोलिसांना माहिती देणे आवश्यक.
या प्रकरणात: चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने उल्लंघन.
सदोष मनुष्यवधाचे कलम का नाही ?
FIR मध्ये BNS कलम 100 किंवा 105 (सदोष मनुष्यवध) जाणीवपूर्वक लावलेले नाही. याचे कारण म्हणजे प्राथमिक तपासात पिडितांची आणि संतप्त जमावाची मागणी असूनही पोलीस निरीक्षक यांना चालकाचा हत्या करण्याचा हेतू किंवा मृत्यू होईल याची जाणीवपूर्वक कृती या घटनेत दिसून आलेली नाही. ज्यामुळे समाजात पोलिस प्रशासनाविषयी तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. कारण यापूर्वी तीन वेळा याच BNA infrastructure कंत्राटदाराच्या डंपरमुळे अशाच प्रकारच्या इतर अपघातांमध्ये आता अंदाजे सात लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या हा प्रकार निष्काळजी वाहनचालकामुळे झालेला अपघाती मृत्यू म्हणून नोंदवला आहे. तथापि, तपासादरम्यान दारूच्या नशेत वाहन चालवणे, जाणूनबुजून धडक देणे किंवा इतर गंभीर पुरावे आढळल्यास अधिक कठोर कलमे जोडली जाऊ शकतात.
या प्रकरणाचा तपास PSI निलेश इंद्रगीर गोसावी करीत असून घटनास्थळ पंचनामा, सीसीटीव्ही तपासणी, साक्षीदारांचे जबाब व डंपर चालकाचा शोध सुरू आहे.
परिसरात शोककळा; न्यायाची मागणी
या दुर्दैवी घटनेने मुक्ताईनगर परिसरात शोककळा
पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांनी दोषी कंत्राटदार BNA इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या चालकाला आणि मालकाला तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी रात्रीचे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक, भरधाव डंपर वाहतुकीवर नियंत्रण, रात्री गस्त वाढविणे आणि सीसीटीव्ही व्यवस्था मजबूत करण्याची मागणी यापूर्वी अनेकदा महसूल व पोलीस प्रशासनाकडे केली आहे. मात्र यावर आजपावेतो कुठलीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp