
भुसावळ | प्रतिनिधी : भुसावळ नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात गंभीर प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील जामनेर रोडवरील अग्निशमन केंद्र क्रमांक 2 काही दिवसांसाठी बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे 44 कंत्राटी कामगारांना सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले असून, यामुळे अग्निशमन सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्याच्या वाढत्या उष्णतेमुळे तापमान 42 ते 45 अंशापर्यंत गेलेले असताना, आणि यापूर्वी सुद्धा अनेकदा आगीच्या घटना समोर आलेल्या असताना या केंद्राची मदत घेण्यात येत होती. मात्र तांत्रिक बाबींच्या पेचामुळे कामगारांच्या मानधनाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नाईलाज म्हणून हे अग्निशमन केंद्र तात्पुरते बंद करण्याची वेळ आली आहे.
26 डिसेंबर रोजी नगरपरिषदेत नवीन सत्ता स्थापन झाली होती. मात्र, नवनिर्वाचित नगराध्यक्ष गायत्री भंगाळे या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयामुळे अपात्र ठरल्यानंतर प्रशासनात अनिश्चितता निर्माण झाली आहे. गेल्या चार महिन्यांत एकही सर्वसाधारण सभा न झाल्याने अग्निशमन विभागासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटी कामगारांना पुरवठा करणाऱ्या कंपनीला काम देण्यात आलेले नाही, तसेच सभेच्या मंजूरीशिवाय नवीन निविदाही काढणे शक्य नसल्याने ऐन उन्हाळ्यात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
या परिस्थितीत कंत्राटी कामगारांचे थकित मानधन कसे आणि कोणत्या पद्धतीने द्यायचे, हा प्रश्न अग्निशमन विभागासमोर निर्माण झाला होता. नगरपालिकेत प्रभारी मुख्याधिकारी कार्यरत असल्याने या विषयावर ठोस निर्णय घेण्यातही अडचणी येत होत्या. परिणामी, अखेर या 44 कामगारांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अग्निशमन विभागाचे प्रमुख विवेक माकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर रोडवरील अग्निशमन केंद्र क्रमांक 2 पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. विभागात सध्या 14 कायम कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्या मदतीसाठी कंत्राटी कामगारांची सेवा घेतली जात होती. मात्र, आता मनुष्यबळ कमी झाल्यामुळे सर्व अग्निशमन यंत्रणा मुख्यालय (केंद्र क्रमांक 1) येथे एकवटण्यात आली आहे.
नगरपरिषदेकडे सध्या पाच मोठे वॉटर टेंडर, दोन क्यूआरबी (Quick Response Vehicle) आणि चार बुलेट दुचाकी असा ताफा आहे. हा संपूर्ण ताफा सध्या मुख्यालयात हलवण्यात आला असून, शहरातील आपत्कालीन सेवांवर ताण वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष पद रिक्त झाल्याने नगरपालिकेचा कारभार सध्या अनिश्चिततेत असून, पुढील प्रशासकीय निर्णय शासनाच्या मार्गदर्शनावर अवलंबून आहेत. उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्याकडे अधिकार येऊन सर्वसाधारण सभेत संबंधित विषय मंजूर होईपर्यंत या प्रश्नावर ठोस तोडगा निघणे कठीण असल्याचे चित्र दिसून येत आहे.
एकूणच, प्रशासकीय अडचणी आणि निर्णयप्रक्रियेतील विलंबामुळे भुसावळ शहराच्या अग्निशमन सेवांवर परिणाम होत असून, आधीच गल्लोगल्ली कचऱ्याचे उकिरडे तुडुंब भरलेले असून त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच, आता नव्या घडामोडींमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.













