बांबूचा ‘धनुष्यबाण’ लक्षवेधी आकर्षण, आदिवासी दिनानिमित्त यावल शहरात भव्य शोभायात्रा
या धनुष्यबाणाचा पूर्वी युद्धात वापर व्हायचा
जळगाव,दि-०९/०९/२०२४, आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावल शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे.या भव्य शोभायात्रेत संपूर्ण जिल्हाभरातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने दाखल होऊन सहभागी झालेले आहेत. यावेळी डिजेच्या तालावर आणि आदिवासी गीतांवर तरूणाई तुफान जल्लोष करताना दिसून आली.या शोभायात्रेत पारंपारिक आदिवासी पोशाखात सजावट करून सहभागी झालेली बालके अत्यंत मनमोहक दिसत होती.यावेळी आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे.
बांबूचा धनुष्यबाण लक्षवेधी
दरम्यान ,या शोभायात्रेत एका आदिवासी बांधवांने बांबूपासून बनवलेला आणि एकाच वेळी तीन तीरांद्वारे ‘लक्ष्य’ भेदणारा दुर्मिळ धनुष्यबाण यावेळी लक्षवेधी आणि प्रमुख आकर्षण ठरलेला आहे. या धनुष्यबाणाचा पूर्वीच्याकाळी युद्धात वापर केला जात होता.ही भव्य शोभायात्रा यावल शहरातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी शासकीय कार्यक्रम होणार आहे.
आदिवासी दिवसाची पार्श्वभूमी
केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आदिवासी समाजाचे लोक राहतात. ज्यांची जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि चालीरीती व पोशाख सामान्य लोकांपेक्षा भिन्न आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्यामुळे आदिवासी समाज आजही मागासलेला आहे. त्यामुळेच भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी आज 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र महासंघाने पहिल्यांदा 1994 हे आदिवासी लोकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले होते.