भुसावळात मंदिरातील पूजाऱ्याची निर्घृण हत्या; डोक्यात टणक वस्तूने वार
वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी चिंता

झेडटीआरआय बोगद्याजवळील धक्कादायक घटना; फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू
भुसावळ, दि. 29 : भुसावळ शहराजवळील झेडटीआरआय बोगद्यालगत असलेल्या मंदिरातील 55 वर्षीय पूजाऱ्याची डोक्यात टणक वस्तूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे भुसावळ शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
मृत पूजाऱ्याचे नाव संतोष रघुवीर मंचल (वय 55, रा. झेडटीआरआय परिसर, भुसावळ) असे असून ते शहरातील आरपीडी रस्त्यालगत लष्करी डेपोपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तीन मंदिरांमध्ये पूजारी म्हणून सेवा बजावत होते. मंदिरांचा परिसर तुलनेने निर्जन असल्याने येथे नागरिकांची फारशी वर्दळ नसते.
सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास संतोष मंचल यांच्या कुटुंबीयांनी मंदिरात जाऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्यांच्या डोक्यावर टणक वस्तूने वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने शहर पोलिसांना कळविले.
माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, हवालदार संदीप पालवे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. तपास अधिक वैज्ञानिक पद्धतीने करण्यासाठी जळगाव येथून ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळाची बारकाईने तपासणी करण्यात आली.
प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी संतोष मंचल यांची हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वैयक्तिक वाद, चोरीचा प्रयत्न किंवा इतर कोणता हेतू या सर्व शक्यतांचा विचार करून पोलिसांकडून तपास सुरू आहे. परिसरातील नागरिकांची चौकशी, उपलब्ध पुराव्यांचे विश्लेषण तसेच संशयितांच्या हालचालींची पडताळणी केली जात आहे.
या निर्घृण हत्येच्या घटनेमुळे भुसावळ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.













