भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा येथे वीज कोसळून २१ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; गावावर शोककळा
वीज पडून सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एक युवक ठार

भुसावळ, प्रतिनिधी : भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा येथे शेतात काम करत असताना वीज कोसळून २१ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर तायडे आणि त्यांचा २१ वर्षीय मुलगा अखिलेश तायडे हे दोघेही शेतात शेतीची कामे करत होते. दरम्यान, अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. याचवेळी अखिलेश तायडे यांच्या अंगावर वीज कोसळली. या भीषण घटनेत तो जागीच कोसळला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील अखिलेश याला उपचारासाठी वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
विशेष म्हणजे, अखिलेश तायडे याच्यावर काही दिवसांपूर्वीच अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृती सुधारल्यानंतर तो लवकरच नोकरीला लागणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. मात्र नियतीने घात केला आणि त्याच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
या दुर्दैवी घटनेनंतर तपत कटोरा गावासह परिसरात शोककळा पसरली असून अखिलेशच्या अकाली निधनाबद्दल सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी पावसाळ्यात वादळी वातावरण व विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात अथवा मोकळ्या जागेत काम करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.













