Advertisement
जळगावराजकीय

भुसावळचे मुख्याधिकारी दिर्घरजेवर, वरणगावच्या सीओंची बदली, प्रांताधिकारी यांचीही लवकरच बदली ? मोठ्या प्रशासकीय घडामोडींनी खळबळ

प्रशासकीय भूकंप होण्याची शक्यता ?

भुसावळ – वरणगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांची नागपूर जिल्ह्यातील खापा नगर परिषदेत पदोन्नतीने बदली झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार ही बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नवीन मुख्याधिकारी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दुसरीकडे, भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी एक महिन्याची रजा घेतली आहे. रजेचे स्पष्ट कारण अधिकृतपणे समोर आलेले नसले तरी, शहरातील संत गाडगेबाबा रुग्णालयाच्या स्थलांतराच्या वादग्रस्त मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ते रजेवर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कालच भाजपने प्रांत कार्यालयात आक्रमक ठिय्या आंदोलन केले होते.
या रजेमुळे मुख्याधिकारी महिनाभर उपलब्ध नसल्याने भुसावळ शहरातील नागरिकांची दैनंदिन कामे खोळंबण्याची शक्यता आहे. पालिकेच्या विकास कामांवर ब्रेक लागण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या तरी राजेंद्र फातले यांच्या जागी तात्पुरता नवीन अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नाही, ज्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ताधारी असताना भाजप विरोधक म्हणून रुग्णालय स्थलांतराच्या मुद्द्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. हा वाद आंदोलनांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर मुख्याधिकारी यांनी या वादापासून चार हात लांब राहणे पसंत केल्याचे बोलले जात आहे.
नागरिकांच्या कामांसाठी आणि शहराच्या विकासासाठी अशा बदल्या व रजांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर नगर विकास विभागाने लवकरात लवकर योग्य तो उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील विविध नगर परिषदांमध्ये मुख्याधिकारी आणि सहायक मुख्याधिकाऱ्यांच्या पदोन्नती, बदल्या आणि नियुक्त्या नियमितपणे होत असल्या तरी, अशा परिस्थितींमुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
प्रांतांचीही बदली दृष्टीपथात ?
भुसावळचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांचीही पदोन्नतीने लवकरच इतरत्र बदली होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांचीही बदली झाल्यास नवीन उपविभागीय अधिकारी भुसावळला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button