
भुसावळ -(मयुरेश निंभोरे) : जळगाव स्थानिक प्राधिकरण विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ, निष्ठावंत आणि संघटनात्मक क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेले नंदकिशोर (नंदूभाऊ) महाजन यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आणि आता माघारीचा विषय संपल्यावर सुद्धा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांचा अक्षरशः महापूर आला आहे. काल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमाठिकाणी देखील व्यासपीठावरील काही मान्यवरांच्या तोंडी हीच कुजबूज सुरू झाली होती. विधान परिषद निवडणूक कोण जिंकणार ? यापेक्षा नंदूभाऊंना उमेदवारी मिळालीच कशी, हा प्रश्न सध्या भाजप कार्यकर्त्यांपासून ते विरोधी पक्षांपर्यंत आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. विधान परिषदेसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये डॉ. केतकी पाटील यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर मानले जात होते. उच्चशिक्षित, तरुण आणि संघटनात्मक कामात सक्रिय असलेल्या डॉ. पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती. मात्र दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून त्या भाजपमध्ये आलेल्या असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षातील काही जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी अखेर नंदकिशोर महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने अनेक राजकीय समीकरणांना धक्का बसल्याची चर्चा आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रभावाला आव्हान ?
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, जिल्ह्यातील भाजपचे प्रभावी नेते व मंत्री गिरीश महाजन तसेच आमदार मंगेश चव्हाण यांच्या पसंतीच्या नावांऐवजी पक्षश्रेष्ठींनी पक्ष धोरणानुसार स्वतंत्र निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत शक्तिसंतुलन, नेतृत्वाचा प्रभाव आणि संघटनात्मक समीकरणांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, नंदूभाऊ महाजन यांच्या उमेदवारीनंतर जिल्ह्यात भाजपमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखेरीज आणखी एखादे प्रभावी ‘पॉवर सेंटर’ सक्रिय झाले आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कथित दुसऱ्या शक्तिकेंद्राला दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा अप्रत्यक्ष पाठिंबा आणि संत मुक्ताबाईंचा आशीर्वाद असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात असून जिल्ह्यात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
“गेम झाला कोणाचा?” कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात विविध चर्चा रंगल्या. “गेम झाला कोणाचा?”, “दिल्ली-मुंबईतील समीकरणे प्रभावी ठरली का?”, “स्थानिक नेतृत्वापेक्षा पक्षश्रेष्ठींचा निर्णय अधिक महत्त्वाचा ठरला का?” असे प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिले जात आहेत. अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असताना अंतिम टप्प्यात नंदूभाऊ महाजन यांच्या नावाची घोषणा झाल्याने अनेक लोकप्रतिनिधींसह राजकीय निरीक्षकांनाही रहस्यमयरीत्या आश्चर्याचा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
निर्णय प्रक्रिया स्थानिक की दिल्लीकेंद्रित?
या उमेदवारीमुळे भाजपमधील निर्णय प्रक्रिया स्थानिक नेतृत्वाच्या प्रभावाखाली चालते की थेट दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या नियंत्रणाखाली, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. नंदकिशोर महाजन यांचा जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिल्हा बँक उपाध्यक्ष असताना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांशी असलेला दीर्घकालीन संपर्क, सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध, रावेर लोकसभा मतदारसंघातील समन्वयक म्हणून असलेली ओळख आणि संघटनात्मक अनुभव हे त्यांचे महत्त्वाचे बलस्थान मानले जात आहे. त्यामुळे मित्रपक्षांमध्येही त्यांच्याबाबत सकारात्मक वातावरण असल्याचे बोलले जात आहे.
रावेर लोकसभा उमेदवारीची पुनरावृत्ती?
राजकीय विश्लेषक या निर्णयाची तुलना रावेर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी प्रक्रियेशी करत आहेत. त्यावेळी काही स्थानिक मतभेद असतानाही पक्षश्रेष्ठींनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली होती. आता विधान परिषद निवडणुकीतही स्थानिक समीकरणांपेक्षा पक्षश्रेष्ठींचा निर्णय निर्णायक ठरल्याचे चित्र दिसत असल्याने जुन्या चर्चांना नव्याने उजाळा मिळाला आहे.
भाजपमध्ये ‘दुसरी टीम’ सक्रिय?
नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीमागे भाजपमधील एका स्वतंत्र गटाने दिल्लीपर्यंत प्रभावी लॉबिंग केल्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या प्रभावी नेतृत्वाखालील गटाशिवाय आणखी एक संघटनात्मक ताकद उभी राहत असल्याचे संकेत या निर्णयातून मिळत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. काही जाणकारांच्या मते, ही उमेदवारी केवळ विधान परिषद निवडणुकीपुरती मर्यादित नसून भविष्यातील जिल्हा भाजप नेतृत्व, संघटनात्मक पुनर्रचना आणि आगामी राजकीय रणनीतीचे संकेत देणारी ठरू शकते.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाची तयारी?
राजकीय जाणकारांच्या मते, भविष्यात भाजपने विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्यास मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सक्षम पर्याय उभा करण्याच्या दृष्टीनेही या उमेदवारीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे ही निवड केवळ आजची राजकीय गरज नसून भविष्यातील नेतृत्व घडविण्याच्या रणनीतीचाही भाग असू शकते.
वारकरी संस्कार, संत मुक्ताबाईंचा आशीर्वाद व साधी प्रतिमा
नंदकिशोर महाजन हे वारकरी परंपरेशी जोडलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. कोथळी येथील संत मुक्ताबाईंच्या पावन भूमीशी त्यांचा भावनिक संबंध असल्याने समर्थकांकडून “संत मुक्ताबाईंचा आशीर्वाद आणि वारकरी संस्कार यांच्याच बळावर महाजन यांना ही संधी लाभली,” अशी भावना व्यक्त केली जात आहे.
सामाजिक, धार्मिक आणि संघटनात्मक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहणारे, सर्वसामान्य कार्यकर्ते व केळी उत्पादक शेतकऱ्यांशी थेट संपर्क ठेवणारे आणि साधी जीवनशैली जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. याच गुणांच्या बळावर त्यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन केल्याचे मानले जात आहे.
रेश्मा काळे यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीत रंगत
दरम्यान, महायुतीसमोर आणखी एक राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट निर्देश मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने निवडणुकीतील उत्सुकता वाढली आहे. महायुतीचे नेते त्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरले नाहीत आणि रेश्मा काळे अखेरपर्यंत निवडणूक रिंगणात राहिल्या, तर ही निवडणूक अपेक्षेपेक्षा अधिक रंगतदार होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज दाखल करताना जळगावातील प्रभावशाली नगरसेवक ललित कोल्हे यांच्या पत्नी सरिता कोल्हे यांची उपस्थितीही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. बोगस कॉल सेंटर प्रकरणात ते अनेक दिवस कारागृहात होते. नुकतेच ते जामिनावर बाहेर आलेले आहेत. त्यामुळे पडद्यामागील राजकीय घडामोडींविषयी उत्सुकता अधिक वाढली आहे.
एकनाथराव खडसे यांचे मौनही चर्चेत
या संपूर्ण घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांचे मौनही विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रभावी भूमिका बजावणारे खडसे यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे पडद्यामागून काही हालचाली सुरू आहेत का, की ते खरोखरच या निवडणुकीपासून अलिप्त आहेत, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
जिल्ह्याच्या राजकारणाला नवा संदेश
नंदकिशोर महाजन यांची उमेदवारी ही केवळ एका व्यक्तीची निवड नसून जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या भविष्यातील नेतृत्व, संघटनात्मक रचना आणि अंतर्गत राजकीय आणि सामाजिक समीकरणांना दिशा देणारा निर्णय असल्याचे जाणकारांचे मत आहे. एकीकडे मंत्री गिरीश महाजन यांचे प्रभावी नेतृत्व, दुसरीकडे पक्षश्रेष्ठींचा निर्णायक हस्तक्षेप, मित्रपक्षांतील बदलती समीकरणे, वारकरी परंपरेतून आलेली नंदकिशोर महाजन यांची स्वीकारार्ह प्रतिमा, रेश्मा काळे यांची बंडखोर भूमिका आणि एकनाथ खडसे यांचे मौन या सर्व घटकांमुळे जळगाव स्थानिक प्राधिकरण विधान परिषद निवडणूक राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेचा विषय बनली आहे. आता रेश्मा काळे माघार घेतात की लढत अखेरपर्यंत रंगते, तसेच नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीमागील राजकीय गणित नेमके काय होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.













