मुक्ताईनगरात आंतरजिल्हा वाहनचोरी टोळीचा पर्दाफाश, २५.८० लाखांच्या ३० दुचाकी जप्त,SDPO केदार बारबोलेंच्या पथकांची धडाकेबाज कारवाई सुरूच
एकाच महिन्यात दुसरी मोठी कारवाई

भुसावळ/मुक्ताईनगर, दि. २७ : जळगाव जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या विशेष सूचनांनुसार मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरजिल्हा वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपी आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ३० चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण अंदाजे किंमत २५ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दि. २६ जून २०२६ रोजी गुन्हा क्रमांक २७३/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक माहितीचे विश्लेषण, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि पोलिसांनी केलेल्या सखोल तपासातून संशयितांचा शोध घेण्यात आला.
तपासादरम्यान विशाल सुरेश सोनवणे (रा. पिंपरूड, ता. यावल) आणि कुंदन सुनील महाले (रा. सालबर्डी, ता. मुक्ताईनगर) यांना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय दोन अल्पवयीन मुलांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी मुक्ताईनगरसह राज्यातील विविध भागांतून ३० मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या दुचाकी विविध रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांच्या पार्किंगमधून चोरल्याचे त्यांनी सांगितले. चोरीनंतर या दुचाकी रेल्वे स्थानक अथवा बसस्थानकांच्या पार्किंगमध्येच काही काळ उभ्या करून ठेवून नंतर ग्राहक शोधून त्यांची विक्री करण्याची त्यांची कार्यपद्धती असल्याचे तपासात समोर आले.
तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकली महाराष्ट्रातील विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) नोंदणीकृत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सर्व वाहने जप्त करून त्यांचा पंचनामा केला असून त्यांची एकूण किंमत सुमारे २५.८० लाख रुपये असल्याचे सांगितले.
या आरोपींकडून उघडकीस आलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये गुजरात राज्यातील उधना (सुरत) पोलीस ठाणे, ठाणे जिल्ह्यातील कल्याण, नवी मुंबईतील नेरूळ, नाशिक जिल्ह्यातील निफाड, तसेच वणी, इगतपुरी, गंगापूर, ओझर, सरकारवाडा, रायगड जिल्ह्यातील नेरळ, आणि जळगाव जिल्ह्यातील पारोळा, जिल्हापेठ व एरंडोल पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
ही संपूर्ण कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारवोले यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशीष आडसुळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचारी अनय खंडेराव, महेश सुर्वाडे, पो.ना. असीम तडवी, पो.ना. कळेश आमलेकर, पो.अं. संदीप धनगर, पो.अं. सुनील मोरे, पो.अं. चेतन महाजन, पो.अं. रविंद्र धनगर, पो.अं. प्रशांत चौधरी, पो.अं. सुरेश खोडपे, पो.अं. दीपक ठाकरे, पो.अं. स्वप्नील पवार आणि पो.अं. अक्षय वाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या यशस्वी कारवाईमुळे जळगावसह राज्यातील विविध भागांतील वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्यास मदत झाली असून, चोरीस गेलेल्या वाहनांच्या मालकांना त्यांची वाहने परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच वाहनचोरांच्या टोळीवर प्रभावी कारवाई केल्याने भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.













