Advertisement
जळगावनिवडणूकराजकीय

भुसावळ नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांची निवड; भाजपचा मोठा विजय

भुसावळ, दि. १५ जानेवारी २०२६ – भुसावळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नगरसेविका सौ. शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमतासह विरोधकांना मोठा धक्का दिला असून, ही निवडणूक भाजपसाठी मोठा चेकमेट ठरली आहे.
निवडणूक प्रक्रिया उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडली. पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा सौ. गायत्री भंगाळे आणि मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या उपस्थितीत प्रस्तावांची छाननी करण्यात आली. या वेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक सभागृहात उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून दोन उमेदवारांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यामध्ये नगरसेविका सौ. प्रिया बोधराज चौधरी आणि सौ. शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांचा समावेश होता. भाजपचे सूचक नगरसेवक युवराज लोणारी तर अनुमोदक राजेंद्र आवटे होते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे सुनिता कृष्णधन कर यांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
प्रस्ताव सादर झाल्यानंतर १५ मिनिटांचा माघार घेण्याचा कालावधी देण्यात आला. या कालावधीत भाजपच्या प्रिया बोधराज चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपकडून फक्त शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे गटनेते सचिन संतोष चौधरी यांनी गुप्त पद्धतीने (बॅलेट पेपरवर) मतदान घेण्याची मागणी केली. मात्र, मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी कायद्यातील तरतुदींचे वाचन करून ही विनंती फेटाळून लावली, कारण उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी हात उंचावून (हात दाखवून) मतदानाची तरतूद आहे.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. सुनिता कृष्णधन कर यांच्यासाठी नगराध्यक्षांसह इतर नगरसेवक मिळून एकूण १५ हात उंचावून मतदान झाले. तर भाजपच्या शैलजा नारखेडे यांच्यासाठी ३२ हात उंचावून मतदान झाले.
या स्पष्ट बहुमतामुळे पिठासीन अधिकारी यांनी सौ. शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांच्या नावाची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.
शैलजा नारखेडे आणि त्यांचे पती माजी नगरसेवक पुरूषोत्तम नारखेडे हे गेल्या तीस वर्षांपासून प्रभाग क्रमांक २१ मधून सातत्याने जनसेवेच्या माध्यमातून निवडून येत आहेत. त्यांच्या कार्याचा आणि लोकांशी असलेल्या जवळीकेचा हा परिणाम म्हणून या विजयाला विशेष महत्त्व आहे.
या निवडणुकीत अपक्ष आसिफ खान (मक्का), काँग्रेसचे रोहन सूर्यवंशी, काजल मोरे आणि अपक्ष मानवी आहुजा हे चार नगरसेवक तटस्थ राहिले.
भाजपने या निवडणुकीत दाखवलेल्या एकजुटीमुळे आणि रणनीतीमुळे विरोधकांना मोठा धक्का बसला असून, भुसावळ नगरपरिषदेतील सत्ता समीकरणात भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button