‘रॉयल स्टॅग’ नावाने बनावट दारू निर्मिती कारखान्यावर पोलिसांची धडक कारवाई; १.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त
'रॉयल स्टॅग' प्रेमींसाठी धोक्याची घंटा ?

भुसावळ,दि-१९/०४/२६, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात कठोर मोहीम सुरू केली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली बनावट विदेशी दारू निर्मितीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
अकुळखेडा शिवारातील गिरीराज लॉन्सजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये ‘रॉयल स्टॅग’ या ब्रँडच्या नावाखाली बनावट दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा छापा टाकून सुरू असलेले उत्पादन व पॅकिंग उघड केले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी
◾१८० मिलीच्या भरलेल्या बनावट दारूच्या बाटल्या
◾सुमारे ३० लिटर बनावट मद्य
◾२५०० रिकाम्या काचेच्या बाटल्या
◾५००० सीलिंग बूच
◾गुळमिश्रित रसायन व इतर घातक पदार्थ
◾पॅकिंग साहित्य आणि मोबाईल फोन
असा एकूण १ लाख ८ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या ठिकाणी मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकणाऱ्या रसायनांचा वापर करून दारू तयार केली जात असल्याचेही उघड झाले आहे. या बनावट दारूची विक्री यापूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील ढाब्यांवर केली असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण शिंपी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजवर्धन पाटील, कपिल पाटील आणि रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी पुढील तपास करत आहेत. नव्या निरीक्षकांच्या या धडक कारवाईमुळे चोपड्यातील अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, शहरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.












