फत्तेपूर पोलीस ठाणे हद्दीत महिलेवर गँगरेप ; १५ पैकी १४ आरोपी जेरबंद, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ
15 जणांच्या गँगरेपने मोठी खळबळ

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ जून २०२६ रोजी घडलेल्या अत्यंत गंभीर सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी धडक कारवाई करत १५ पैकी १४ आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हाभरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून मोठी कारवाई केली आहे. सध्या परिसरात शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून रोजी देऊळगाव–कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील निर्जन जंगल परिसरात ४० वर्षीय महिला तिच्या परिचयातील मित्रासोबत बसलेली असताना, तेथे १५ जणांचा समूह आला. त्यांनी दोघांना धमकावल्याचा आरोप असून, त्यानंतर त्यापैकी दोघांनी महिलेवर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या अमानुष कृत्यादरम्यान इतर काही सहआरोपींनी मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधितांपैकी एका संशयिताने हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याने संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आणि मोठी खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच फत्तेपूर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या.
या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४१/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७०(१) (सामूहिक बलात्कार), ७७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ व ६७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एकूण १५ आरोपींपैकी १४ मुख्य व सहआरोपींना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे.
या प्रकरणामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होईपर्यंत तो समोर न आल्याने, अशा घटनांवर वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी अधिक प्रभावी गुप्त माहिती यंत्रणा, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना आणि सोशल मीडियावर गुन्हेगारी स्वरूपाचे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा सर्वंकष तपास करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













