जळगावात 15000 ची लाच घेताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यासह खाजगी व्यक्तीवर गुन्हा दाखल
आरोपीच्या हॅण्डबॅग मध्ये 2,26,000 रू सापडले

जळगाव, दि. २४ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जळगाव कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र पांडुरंग सूर्यवंशी (वय ४२, रा. फ्लॅट नं. ०५, बिल्डिंग नं. १५, नवआकाश सोसायटी, धात्रक फाटा, पंचवटी, नाशिक) आणि खाजगी व्यक्ती (पंटर) मनोज बापू गजरे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ०७, ०७(अ) आणि १२ अंतर्गत जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गु.र.नं. २७९/२०२५). त्यांनी तक्रारदाराकडून १५,००० रुपये लाच स्वीकारल्याचा आरोप आहे.
प्रकरणाची हकीकत अशी…
तक्रारदार हे रावेर येथील एका हॉस्पिटलमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या हॉस्पिटलच्या मालकाने १६ मार्च २०२५ रोजी हॉस्पिटलच्या बायोवेस्ट संबंधीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी अर्जात त्रुटी काढून तो नामंजूर केला. त्यानंतर तक्रारदाराने नाशिक कार्यालयात अर्ज करून २८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रमाणपत्र प्राप्त केले.
तक्रारदाराने जळगाव कार्यालयातील मागील अर्ज मागे घेण्यासाठी ११ सप्टेंबर २०२५ रोजी सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यावेळी सूर्यवंशी यांनी अर्ज रद्द करण्यासाठी १५,००० रुपये लाचेची मागणी केली आणि ही रक्कम खाजगी व्यक्ती मनोज बापू गजरे यांच्यामार्फत स्वीकारण्यास सांगितले. लाच देण्यास इच्छुक नसलेल्या तक्रारदाराने २३ सप्टेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे लेखी तक्रार नोंदवली.
सापळा कारवाई
तक्रारीच्या पडताळणीनंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २४ सप्टेंबर २०२५ रोजी सापळा रचला. या कारवाईदरम्यान, मनोज बापू गजरे यांनी सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून १५,००० रुपये लाच स्वीकारली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास आणि कारवाई
या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले आहे. सापळा आणि तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस नाईक बाळू मराठे आणि पोलीस शिपाई भूषण पाटील यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
लाचखोरीविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा देत, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अशा प्रकरणांमध्ये नागरिकांनी तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे.













