Advertisement
राजकीय

सातपुडा दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम; नागरिकांच्या समस्या ऐकून तात्काळ कारवाईचे आदेश

भुसावळ : शासन नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचा प्रत्यय यावल तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी ४ व ५ जून रोजी लंगडाआंबा, जामन्या, गाढ्या आणि उसमळी या दुर्गम आदिवासी गावांना भेट देत रात्रीचा मुक्काम केला. या दौऱ्यात त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच विविध विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि मूलभूत सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेत संबंधित विभागांना तातडीने कारवाईचे निर्देश दिलेत.
जामन्या येथे वनविभागाच्या कार्यालय परिसरात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पंचक्रोशीतील सुमारे १०० ते १२५ ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी रेशन धान्य वितरण, आरोग्य सेवा, रस्ते, दळणवळण, रोजगार, घरकुल, सौरऊर्जा, वनहक्क आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले.


रेशन दुकानावर तत्काळ कारवाई
रेशन धान्य वितरणातील त्रुटींबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच दिवशी जामन्या येथील स्वस्त धान्य दुकानाची पाहणी केली. धान्याची गुणवत्ता, वितरण व्यवस्था आणि लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्याच्या प्रमाणाची तपासणी केल्यानंतर संबंधित स्वस्त धान्य दुकान तात्काळ निलंबित करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या. तसेच वितरण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्याचे आदेशही देण्यात आले.


आरोग्य उपकेंद्र बंद; अधिकारी-कर्मचाऱ्यांना गावात राहण्याचे आदेश
ग्रामस्थांनी जामन्या येथील आरोग्य उपकेंद्र सातत्याने बंद राहत असल्याची आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी गावात वास्तव्यास राहत नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून दिली. याची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली. उपकेंद्रात स्वच्छता, वीजपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव आढळून आल्याने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावातच वास्तव्यास राहून नागरिकांना चोवीस तास आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आदेश देण्यात आले. कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.


रखडलेल्या रस्ते कामांना गती देण्याचे निर्देश
मोहमांडळी-माथन-गाढ्या (PMGSY) मार्ग, हरिपुरा-आंबापाणी-उसमळी-लंगडाआंबा आणि वाघझिरा-लंगडाआंबा रस्त्यांची कामे रखडल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. यावर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. भविष्यात या भागात मिनी बस सेवा सुरू करण्याच्या मागणीबाबतही सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणंद योजनेत आवश्यक शेतरस्त्यांचा समावेश करून कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.


बीएसएनएल नेटवर्कची प्रत्यक्ष तपासणी
दौऱ्यादरम्यान लंगडाआंबा, उसमळी आणि गाढ्या-जामन्या येथील बीएसएनएल मोबाईल टॉवरची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः फोन करून नेटवर्क उपलब्धता, कॉल कनेक्टिव्हिटी आणि संभाषणाची गुणवत्ता तपासली. दुर्गम भागातील नागरिकांना अधिक सक्षम दूरसंचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले.


समुदाय वनहक्क निधी व रोजगारनिर्मितीवर भर
समुदाय वनहक्क (CFR) अंतर्गत मंजूर निधी आणि त्याअंतर्गत होणाऱ्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि इतर विकासकामे प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
स्थानिक रोजगारनिर्मितीस चालना देण्यासाठी डिंक, चारोळी आणि बांबू आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला. बांबू लागवड, प्रक्रिया व मूल्यवर्धन यासंदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासह चंद्रपूर येथे अभ्यास दौरा आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
घरकुल योजनेतील विलंबावर नाराजी
घरकुल योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांपैकी केवळ सात घरकुले पूर्ण झाल्याचे समोर आले. आधार संलग्नीकरणातील अडचणींमुळे अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. यावर विशेष मोहीम राबवून शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले.
सौरऊर्जा आणि डिजिटल सेवांवर विशेष भर
दुर्गम भागातील नागरिकांची ऑनलाइन कामे सुलभ व्हावीत यासाठी आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच कुसुम सोलर योजनेतील लाभार्थ्यांना अपूर्ण साहित्य मिळाल्याची बाब समोर आल्यानंतर उर्वरित साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. संपूर्ण गाव सौरऊर्जायुक्त करण्याच्या संकल्पनेवरही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
पर्यावरण दिनी वृक्षारोपण; शाळांना भेट
५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकाऱ्यांनी वनलागवड, मृद व जलसंधारण कामांची पाहणी केली तसेच सीताफळाच्या रोपाचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यानंतर जामन्या येथील शासकीय आश्रमशाळा आणि जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शैक्षणिक सुविधांचा आढावा घेण्यात आला. उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. नवीन वर्गखोल्या, दुरुस्ती व मूलभूत सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आले.
लोकाभिमुख प्रशासनाचा प्रत्यय
ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर केवळ बैठकीपुरते मर्यादित न राहता त्याच दिवशी प्रत्यक्ष स्थळभेटी, तपासण्या आणि विभागनिहाय आदेश देण्यात आल्याने प्रशासनाची तत्परता आणि लोकाभिमुख कार्यपद्धती अधोरेखित झाली. या दौऱ्यामुळे दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी विश्वास, समाधान आणि सकारात्मकता निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. दौऱ्यादरम्यान उपविभागीय अधिकारी फैजपूर, तहसीलदार यावल, महसूल, आदिवासी विकास, वन विभाग तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp