मोंढाळा गावाजवळ भरधाव डंपरची दुचाकीला धडक; मनोज वाघ यांचा जागीच मृत्यू

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील मोंढाळा गावातील दुचाकीस्वाराचा भरधाव डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (२० मे) संध्याकाळी घडली. चोरवड गावाजवळ कुऱ्हा पानाचे रस्त्यावर मंगल वस्ताद ढाब्याजवळ हा भीषण अपघात झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मनोज पांडुरंग वाघ (वय ३९, रा. मोंढाळा, ता. भुसावळ) असे आहे. ते मोंढाळा येथे सलून व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. घरातील एकमेव कमावती व्यक्ती गेल्याने वाघ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, डंपर क्रमांक एमएच १९ झेड ४९११ हे कुऱ्हा पानाचे गावाकडून भुसावळकडे जात होते. त्याचवेळी मनोज वाघ हे त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एमएच १९ ईसी ३२३४ ने भुसावळकडून कुऱ्हा पानाचे गावाकडे जात असताना समोरून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मनोज वाघ गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. जखमी अवस्थेत मनोज वाघ यांना तातडीने भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर जप्त करून तालुका पोलीस ठाण्यात जमा केला आहे. संतप्त ग्रामस्थांनी संबंधित डंपर चालक व मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून मृताच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने पोलिसांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल धिरज मंडलिक पुढील तपास करीत आहेत.
मनोज वाघ हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनाने मोंढाळा गावात हळहळ व्यक्त होत आहे.













