मुक्ताईनगरात बिबट्याला ‘पब्लिक मार’, बिबट्याला पकडण्याचा पब्लिकचा थरार, वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचीची जोरदार मागणी
बिबट्याला पकडल्याने दहशत निवळली ! मात्र काही काळ होती अघोषित संचारबंदी!

मुक्ताईनगर दि-12/04/2026 : शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात बिबट्या घुसल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या अकार्यक्षमतेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन-चार महिन्यांपासून विश्रामगृहाच्या मागील भागात रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन होत असल्याची माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली होती. मात्र, वारंवार सूचना देऊनही अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. या निष्काळजीपणाचाच परिणाम म्हणून अखेर बिबट्याने थेट शहरात प्रवेश करत विश्रामगृहात दोन तासांहून अधिक काळ ‘विश्रांती’ घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दरम्यान, ही बातमी मुक्ताईनगर शहरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. सकाळपासूनच बिबट्या शहरात फिरत असल्याच्या अफवांनी उधाण आले. अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले, तर बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. सुरक्षेच्या कारणास्तव बसस्थानक देखील काही काळासाठी रिकामे करण्यात आले होते. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत पालक अधिक सतर्क झाल्याचे दिसून आले.
या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे, वनविभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल न झाल्यामुळे काही नागरिकांनी जीव धोक्यात घालून लाठ्या-काठ्या घेऊन बिबट्यावर हल्ला चढवला. ‘पब्लिक मार’ झाल्याने बिबट्या बेशुद्ध पडला असून त्याला सध्या वनविभागाच्या ताब्यात मुक्ताईनगर कार्यालयात आणण्यात आल्याची माहिती समोर आहे. ज्यामुळे आता नागरिकांमध्ये असलेली दहशत कमी होणार आहे. या प्रकारामुळे वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित होत असून संबंधित वन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
याशिवाय, प्रत्यक्षदर्शींनी शहरातील विविध भागात सकाळी बिबट्याच्या हालचालींचे संकेत दिले होते, या सर्व पार्श्वभूमीवर वनविभागाचे अधिकारी मात्र सुरुवातीपासूनच निष्क्रिय राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. इतकेच नव्हे, तर काही पत्रकारांचे मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्याचा आरोपही समोर आला असून संबंधित वनअधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
ही घटना मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे स्पष्ट संकेत देत असून प्रशासनाने तात्काळ प्रभावी उपाययोजना न केल्यास भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.












