यावल कृउबा अंतर्गत केळीला हमीभाव द्या; न्हावी येथे शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन, व्यापाऱ्यांच्या मनमानी दरांविरोधात संताप;

भुसावळ (प्रतिनिधी), दि. १ : यावल कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी न्हावी (ता. यावल) येथील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता बऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्गावरील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या चौफुलीवर तीव्र आंदोलन छेडले. यावेळी शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत केळी फेकून निषेध व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांची मागणी आहे की, रावेर बाजार समितीच्या दरानुसारच केळीला भाव द्यावा, बऱ्हाणपूर बोर्डाचा दर लागू करू नये, तसेच केळीला हमीभाव जाहीर करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. परवानाधारक व्यापाऱ्यांनाच खरेदीची परवानगी द्यावी व केळी कापणीच्या पावतीवर व्यापाऱ्यांचा परवाना क्रमांक नमूद करणे बंधनकारक करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

न्हावी गावात सुमारे ३० केळी व्यापारी गट असून त्यापैकी केवळ चारच परवानाधारक असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. उर्वरित व्यापारी बेकायदेशीरपणे व्यवहार करत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना योग्य वेळी पैसे मिळत नसल्याने त्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
सध्या बाजारभाव १५०० ते १६०० रुपये असताना प्रत्यक्षात ४०० ते ५०० रुपयांदराने केळी खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. एका केळीच्या खोडामागे १५० ते २०० रुपये खर्च येत असून मजुरी, खत, नांगरट आदी खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असून आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, न्हावी गावातून दररोज सुमारे १०० गाड्यांद्वारे केळीची वाहतूक होते. प्रत्येक गाडीमागे ५०० रुपये वसुली होत असून दररोज सुमारे ५ लाख व महिन्याला अंदाजे दीड कोटी रुपये उत्पन्न बाजार समितीला मिळत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. मात्र, त्या तुलनेत शेतकऱ्यांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला.
आंदोलनादरम्यान तहसीलदार मोहनमाला नाझिरकर व फैजपूर येथील प्रांताधिकारी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हाधिकारी प्रत्यक्ष येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. अखेर दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात न्हावी परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने जिल्हा दुध संघ संचालक नितीन चौधरी, माजी जि.प. सदस्य डॉ चंद्रकांत चोपडे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे, रविंद्र कोलते, यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.












