16 वर्षांवरील मुलांना हिनियस क्राईममध्ये ‘ॲडल्ट’ म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं – गृहमंत्री फडणवीसांचे पुणे अपघात प्रकरणी मोठे विधानं
अपघातात 2 जण ठार झालेत
पुणे ,दि-21 मे 2024, पुण्याच्या कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री एका अल्पवयीन मद्यधुंद युवकाने भरधाव पोर्शे या आलिशान कारच्या धडकेने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता. आरोपी हा पुण्यातील बड्या बिल्डर बापाचा लेक असल्याने त्याला बालगुन्हेगार कायद्याच्या पळवाटेने लगोलग जामीनही मिळाला. त्यानंतर या घटनेविरोधात पुण्यासह महाराष्ट्रातील जनमानसांत तीव्र संतापाची लाट निर्माण झालेली आहे. गरिबांचा जीव एवढा स्वस्त झालाय का ? असे प्रश्न लोक सरकारला विचारत आहेत. दरम्यान घटनेची गंभीर दखल घेऊन आज गृहमंत्री फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलिसांकडून कारवाईची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणावर सविस्तर भाष्य केलेलं आहे.
बालहक्क मंडळाच्या भूमिकेने खरेतर पोलिसांना जबर धक्का बसला. आरोपीला घटनेच्या २४ तासांच्या आतच जामीन दिल्यानंतर लोकांमध्ये संताप आणि नाराजी आहे. आरोपीची सहज सुटका होणे हे सहन केले जाणार नाही, असे सांगत बालहक्क मंडळाची ऑर्डर आज किंवा उद्या बुधवारी आल्यावर आरोपीची रिमांड मिळेल, अशी अपेक्षा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. त्याचवेळी आरोपी अल्पवयीन मुलगा, मुलाचे वडील तसेच पबमधील ज्यांनी अल्पवयीन मुलाला दारू दिली त्या कोसी पबचा मालक नमन भुतडा, बार काउंटर मॅनेजर सचिन काटकर आणि ब्लॅक क्लब मॅनेजर सचिन सांगळे यांना पोलिसांनी अल्पवयीन मुलांना दारू पुरवल्याप्रकरणी अटक केलेली आहे. आरोपी विरोधात कलम भा.दं.वि.कलम 304 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. तसेच निर्भया हत्याकांड नंतर कायद्यात झालेल्या दुरुस्तीनंतर सोळा वर्षांवरील युवकांना अशा गुन्ह्यात अटक होऊ शकते. आरोपी मुलगा १७ वर्षे ८ महिन्यांचा असल्यामुळे निर्भया प्रकरणानंतर जे बदल कायद्यात झालेले आहेत त्यानुसार १६ वर्षाच्या वरील मुलांना हीनियस क्राईममध्ये ॲडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं. याबाबतचे माझ्याकडे रिमांड अप्लिकेशन आहे. असे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितलेले आहे. न्यायमूर्ती जुवेनाईल यांच्या बालहक्क मंडळाने या अल्पवयीन युवकाला दिलेल्या शिक्षेच्या आणि जामिनाच्या आदेशाविरोधात आम्ही वरील कोर्टात दाद मागणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. फडणवीस पुढे म्हणाले, अपघातानंतर पुणे पोलिसांनी योग्य कारवाई केली. पोलिसांनी सर्व घटनेचे पुरावे बालहक्क न्याय मंडळाला दिलेले आहेत. पण तरीही बालहक्क न्याय मंडळाने दिलेला निकाल हा पोलिसांसाठी धक्कादायक होता. या प्रकरणाला पोलिसांनी अत्यंत गंभीरतेने घेतलेले असून याप्रकरणात आरोपीची सहज सुटका होणे हे कदापी सहन केले जाणार नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितलेले आहे.
तसेच त्यांनी पालकांना देखील एक निवेदन संबोधित केलेले असून अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देऊ नका तसेच त्यांना मद्यपान करण्याची सवय असल्यास त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच यापुढे पुण्यातील हॉटेल, पबची अनुज्ञप्ती च्या अटी शर्ती मध्ये ते नागरी वस्ती पासून दूर ठेवण्याबाबत योग्य ते बदल केले जातील असे जाहीर केलेले आहे.