एक लाखाची लाच घेताना पोलीस स्टेशनचा पोलीस नाईक रंगेहाथ एसीबीच्या सापळ्यात, जळगाव एसीबीची मोठी कारवाई
आणखी एका बड्या अधिकाऱ्याची चौकशी होण्याची शक्यता ?

जळगाव, दि. १३ एप्रिल २०२६ : जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनमधील एका पोलीस नाईकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ला.प्र.वि.) रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. विनोद पितांबर अहिरे (पो.ना./४०) असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने एका तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारली. ला.प्र.वि. जळगावकडे प्राप्त तक्रारीनुसार, तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या अर्जाची चौकशी आरोपी अहिरे यांच्याकडे होती. या प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी आरोपीने २ लाख रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने तत्काळ याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर १३ एप्रिल २०२६ रोजी सापळा कारवाई राबविण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपीने पंचांसमक्ष पुन्हा लाच मागणीची पुष्टी केली.
सापळा कारवाईत तक्रारदार शनिपेठ पोलीस स्टेशन परिसरात गेल्यानंतर, आरोपीने पोलीस स्टेशनच्या बाहेरच १ लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारली. ही रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा (गु.क्र. १२०२६) दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वात पार पडली. सापळा पथकात पोउपनिरीक्षक सुरेश पाटील, संगिता पवार, राकेश दुसाने, सचिन चाटे आणि अमोल भुसवंशी यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करत आहेत.
दरम्यान, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्राने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा. ही कारवाई भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेचा भाग असून, अशा प्रकारच्या तक्रारींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही विभागाने दिला आहे.












