Advertisement
अर्थकारणजळगावनिवडणूकमहाराष्ट्रमुंबईराजकीय

जळगावात विधान परिषदेचे आमदार होण्यासाठी ‘इतक्या’ उमेदवारांचे अर्ज दाखल, भाजपकडून नंदकिशोर महाजन, भुसावळच्या ३ अपक्षांसह रंगतदार लढतीची चिन्हे

भाजपसमोर तुल्यबळ उमेदवार नाहीच !

जळगाव, दि. १ जून २०२६ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी पूर्ण झाली असून एकूण १६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिद्ध केलेल्या वैध उमेदवारांच्या यादीमुळे आता या निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. काल नंदकिशोर महाजन यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपकडून इच्छुक असलेले दावेदार डॉ केतकी पाटील आणि नंदकुमार अडवाणी यांचा पत्ता कट झाल्याने ते जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आले नाही. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील हे देखील प्रबळ दावेदार होते. तशी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फिल्डिंग लावलेली होती. पण महायुती म्हणून भाजपकडे जळगावची जागा गेल्याने गुलाबराव पाटील आणि त्यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे. मात्र त्यांचे भुसावळ येथील कट्टर समर्थक नगरसेवक दिपक धांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. तसेच भुसावळचे अनिल चौधरी यांनी देखील अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांनी २०१० या वर्षी गाजलेली विधान परिषद निवडणुक सुद्धा अपक्ष म्हणून लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. एकंदरीत सध्याची राजकीय परिस्थिती बघता भाजपचे पारडे जड मानले जात आहे. प्रत्येक निवडणुकीत महत्वाची भूमिका पार पाडणारे खडसे कुटुंब सध्या तरी या निवडणुकीपासून अलिप्त दिसत आहे. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह अनेक अपक्ष उमेदवारांनीही मैदानात उडी घेतली आहे. महापालिका,नगरपरिषद, नगरपंचायत सदस्यांच्या ६३० मतांवर ही निवडणूक अवलंबून असल्याने सर्वच उमेदवारांकडून जोरदार संपर्क मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.
वैध ठरलेले उमेदवार

  1. प्रवीण गंगाराम पाटील (अपक्ष)
  2. चौधरी निलेश सुरेश (अपक्ष)
  3. आरिफ मोहम्मद दारा मोहम्मद (अपक्ष)
  4. जंगले सुनील भीमराव (अपक्ष)
  5. शेख दानिश शेख निसार (अपक्ष)
  6. जावेद इकबाल अब्दुल रशीद (अपक्ष)
  7. नंदकिशोर भगवान महाजन (भारतीय जनता पार्टी)
  8. तायडे शरद शामराव (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
  9. चौधरी सचिन संतोषभाऊ (अपक्ष)
  10. चौधरी अनिल छबिलदास (अपक्ष)
  11. रेशमा कुंदन काळे (अपक्ष)
  12. दीपक काशिनाथ धांडे (अपक्ष) शिंदे गट बंडखोर?
  13. निलेश गणेश झोपे (अपक्ष)
  14. कलीमखान हैदरखान मनियार (अपक्ष)
  15. हितेंद्र रमेश देशमुख (अपक्ष)
  16. घुषेश्वर रामकृष्ण पाटील (अपक्ष)
    पक्षीय समीकरणांवर लक्ष
    या निवडणुकीत भाजपने नंदकिशोर महाजन यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. तर शरद तायडे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. याशिवाय अनेक अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरल्याने निवडणुकीत मतांचे विभाजन आणि स्थानिक राजकीय समीकरणांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतांवर नजर
    जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात जिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य मतदार म्हणून सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार असून उमेदवारांकडून मतदारांशी थेट संपर्क, बैठका आणि रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे.
    माघारीनंतर चित्र आणखी स्पष्ट
    सध्या १६ उमेदवार वैध असले तरी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीनंतर प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अनेक अपक्ष उमेदवार माघार घेण्याची शक्यता असल्याने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होण्याचीही चर्चा सुरू आहे.
    निवडणुकीची वैशिष्ट्ये
    एकूण वैध उमेदवार : १६
    भाजपचा अधिकृत उमेदवार : नंदकिशोर महाजन
    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार : शरद तायडे
    उर्वरित बहुसंख्य उमेदवार अपक्ष
    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांकडून मतदान
    अर्ज माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार
    जळगाव विधान परिषद निवडणुकीत आता राजकीय हालचालींना वेग येणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp