Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

बोरखेडा चार भावंडे हत्याकांड : दोषी महेंद्र बारेलाला फाशीच द्या ; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद

भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयात पहिल्यांदाच आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्याची वकिलांची मागणी

भुसावळ दि-03/06/2026 : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात दोषी ठरलेल्या महेंद्र बारेला याला सर्वोच्च फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी ठाम मागणी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी बुधवारी फास्ट ट्रॅक पोक्सो विशेष न्यायालयात केली. न्यायाधीश एस. आर. यादव यांच्या न्यायालयात शिक्षेच्या टप्प्यातील अंतिम युक्तिवाद पार पडला असून गुरुवारी (४ जून) शिक्षेबाबतचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे.
या प्रकरणात १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या ११, ८ आणि ३ वर्षांच्या तीन लहान भावंडांचीही कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करण्यात आली होती. या चौघांनाही बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नव्हती. घटनेच्या वेळी त्यांच्या आई-वडिलांचा मुक्काम मध्यप्रदेशातील खरगोन येथे होता.
रेअरेस्ट ऑफ रेअर” प्रकरण
सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करताना ॲड. उज्ज्वल निकम यांनी हा गुन्हा “रेअरेस्ट ऑफ रेअर” प्रकारातील असल्याचे सांगितले. आरोपी हा मृत बालकांच्या मोठ्या भावाचा मित्र होता. विश्वास संपादन करून तो घरात गेला आणि तेथेच अत्याचार व हत्याकांड घडवून आणले. त्यामुळे हा गुन्हा केवळ क्रूर नसून विश्वासघाताचे अत्यंत भीषण उदाहरण असल्याचे निकम यांनी नमूद केले.
फाशीची शिक्षा का द्यावी? ॲड निकम यांची दहा प्रमुख कारणे
न्यायालयासमोर युक्तिवाद करताना निकम यांनी फाशीच्या शिक्षेच्या समर्थनार्थ अनेक मुद्दे मांडले.
◾चार निष्पाप बालकांची अमानुष हत्या करण्यात आली.
◾१४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला.
◾आरोपीने कोणत्याही प्रकारची चिथावणी किंवा उकसवणी नसताना गुन्हा केला.
◾पीडित बालके झोपेत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
◾लहान मुलांच्या मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालण्यात आले.

◾ त्यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी कुठलेही साहित्य नव्हते.
◾आरोपीला गुन्ह्याबद्दल कोणताही पश्चात्ताप झालेला दिसून आला नाही.
◾गुन्हा केल्यानंतरही आरोपीचे वर्तन सामान्य होते.
◾समाजात भीती निर्माण करून अशा गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक आहे.
◾आरोपीने विश्वासाचा गैरफायदा घेतला.
◾अशा गुन्हेगाराला दयामाया दाखविणे म्हणजे समाजाशी अन्याय ठरेल.
शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’चा संदर्भ
युक्तिवादादरम्यान निकम यांनी प्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांच्या “हॅम्लेट” नाटकातील पात्रांचा संदर्भ देत आरोपीचे कृत्य अत्यंत दुष्ट आणि अमानवी असल्याचे प्रतिपादन केले. अशा व्यक्तीला दया दाखविणे चूक ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
आरोपीत सुधारणा अशक्य
जळगाव कारागृह अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ आणि तपास अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालांचा संदर्भ देताना निकम यांनी आरोपीची मानसिक स्थिती पूर्णपणे सामान्य असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे मानसिक आजाराचा आधार घेऊन शिक्षेत सवलत देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कारागृहातील समुपदेशन, सुधारणा कार्यक्रम आणि वर्तन अहवालांचा उल्लेख करताना निकम म्हणाले की, आरोपीमध्ये पश्चात्तापाची भावना दिसून आलेली नाही. त्यासाठी त्यांनी संस्कृतमधील “मन्त्रेण शाम्यते सर्पः, न खलः शाम्यते कदा” या उक्तीचा दाखला देत, “गारुडी पुंगी वाजवून सापाला शांत करू शकतो; मात्र काही दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये सुधारणा होणे कठीण असते,” असे प्रतिपादन केले.
बच्चन सिंग प्रकरणाचा दाखला
फाशीच्या शिक्षेच्या समर्थनार्थ निकम यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक Bachan Singh vs State of Punjab निर्णयाचा संदर्भ देत “रेअरेस्ट ऑफ रेअर” तत्त्व न्यायालयासमोर मांडले. समाजाच्या सामूहिक विवेकाला हादरा देणाऱ्या गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.
२८ साक्षीदार आणि भक्कम परिस्थितीजन्य पुरावे
या खटल्यात सरकारी पक्षाने एकूण २८ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही परिस्थितीजन्य पुराव्यांची अखंड साखळी उभी करण्यात आली. घटनास्थळावरील पुरावे, वैज्ञानिक तपास, वैद्यकीय अहवाल आणि तांत्रिक पुरावे यांच्या आधारे आरोपीचा सहभाग सिद्ध करण्यात आला.
या प्रकरणाचे तपास अधिकारी तत्कालीन रावेर पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल होते, तर पैरवी अधिकारी म्हणून बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी यांनी सरकारी पक्षाला महत्त्वाची मदत केली.
आज अंतिम निर्णय
मंगळवारी न्यायालयाने महेंद्र बारेला याला दोषी ठरविले होते. बुधवारी शिक्षेबाबत अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला असून आता गुरुवारी (४ जून) न्यायालय आरोपीला अंतिम शिक्षा सुनावणार आहे. चार निष्पाप भावंडांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या महेंद्र बारेला याला फाशीची शिक्षा मिळणार की जन्मठेप, याकडे आता संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp