आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर एलसीबीची धडक कारवाई; १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेर : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत तब्बल १० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जामनेर पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरखेडा रोड परिसरातील एका घरावर करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हिवरखेडा रोड परिसरातील एका घरातून काही इसम आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नियोजनबद्ध छापा टाकला. छाप्यादरम्यान आरोपींकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच सट्टेबाजीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात
- ९ लाख २ हजार ३०० रुपये रोख रक्कम
- १ लाख ३० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन
- २५ हजार रुपये किमतीचा टीव्ही व साऊंड बार
- ४१ एटीएम कार्ड
- तसेच इतर साहित्याचा समावेश असून
एकूण १० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
देवानंद सुभाष सोनवणे, रितेश अशोक नेरकर, परीक्षित रविंद्र पाटील आणि प्रवीण जगन्नाथ टहाकडे (सर्व रा. जामनेर).
या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २३६/२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ व ५ प्रमाणे चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाकडून आयपीएलच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात ऑनलाईन सट्टेबाजी आणि जुगार अड्ड्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून, अशा अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास जामनेर पोलीस करत आहेत.













