
मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या १७ जागांसाठी अखेर भारतीय निवडणूक आयोगाने अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून २२ जून २०२६ रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यभरात आचारसंहिता लागू झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी संबंधित मतदारसंघातील किमान ७५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे तसेच किमान ७५ टक्के लोकप्रतिनिधी पदावर असणे आवश्यक असते. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये हे निकष पूर्ण न झाल्यामुळे या जागांवरील निवडणुका रखडल्या होत्या. मात्र आता महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व अटी पूर्ण झाल्याचा अहवाल सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान, जळगाव विधान परिषद मतदारसंघात निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. माजी आमदार चंदूभाई पटेल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या चेहऱ्यांसाठी राजकीय लॉबिंग वाढले आहे. या निवडणुकीत नव्याने निवडून आलेले नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिकांमधील नगरसेवक तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष मतदान करू शकणार आहेत. मात्र जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना मतदानाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भाजपकडून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील, नंदू अडवाणी,नंदू महाजन आणि यांची नावे चर्चेत आहेत. तर शिवसेनेकडून मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. यापूर्वी दोन वेळा शिवसेनेने या मतदारसंघातून निवडणूक लढवली असून यंदाही पक्षाने जोरदार तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. संख्याबळाचा विचार करता महायुतीकडे निर्णायक बहुमत असल्याने जळगावसह अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2009 मध्ये अपक्ष मनीष जैन विरूद्ध निखिल एकनाथ खडसे अशी ‘टफफाईट‘ झाली होती. त्यावेळी नगरसेवकांची मोठी लॉटरी लागली होती. त्यात मनिष जैन विजयी झाले होते. त्या निवडणुकीच्या आठवणी आता ताज्या झालेल्या आहेत.
निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
अधिकृत अधिसूचना जारी : २५ मे २०२६ (सोमवार)
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : ०१ जून २०२६ (सोमवार)
अर्ज छाननी : ०२ जून २०२६ (मंगळवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : ०४ जून २०२६ (गुरुवार)
मतदान दिनांक : १८ जून २०२६ (गुरुवार)
मतदानाची वेळ : सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:००
मतमोजणी व निकाल : २२ जून २०२६ (सोमवार)
ज्या सदस्यांचा कार्यकाळ संपला
सोलापूर – प्रशांत परिचारक
अहमदनगर – अरुणकाका जगताप
ठाणे – रवींद्र फाटक
जळगाव – चंदूभाई पटेल
सांगली-कम-सातारा – मोहनराव कदम
नांदेड – अमरनाथ राजूरकर
यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी
पुणे – अनिल भोसले
भंडारा-कम-गोंदिया – डॉ. परिणय फुके
रायगड-कम-रत्नागिरी-कम-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे
नाशिक – नरेंद्र दराडे
वर्धा-कम-चंद्रपूर-कम-गडचिरोली – रामदास आबिटकर
अमरावती – प्रवीण पोते
उस्मानाबाद-कम-लातूर-कम-बीड – सुरेश धस
परभणी-कम-हिंगोली – विप्लव बजोरिया
औरंगाबाद-कम-जालना – अंबादास दानवे
राज्यातील या निवडणुकांमुळे पुन्हा एकदा स्थानिक राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली असून आगामी काही दिवसांत उमेदवार निवड, पक्षांतर्गत लॉबिंग आणि राजकीय समीकरणांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.













