Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

भुसावळ सत्र न्यायालयाचा निकाल : लिव्ह-इन पार्टनर महिलेची विहीरीत ढकलून हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेप आणि ₹५,००० दंड

भुसावळ दि-२९/१०/२०२५, मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव रोडवरील पोहेकर यांच्या शेतातील विहीरीत लिव्ह-इन पार्टनर महिलेला ढकलून हत्या करणाऱ्या आरोपी गुलाम इद्रीस गुलाम हुसेन (वय ४५, रा. मोमीनपुरा, वार्ड क्र. ३०, श्रीकुमार बिल्डिंगजवळ, बुरहानपूर, मध्य प्रदेश) यास भुसावळ सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि ₹५,००० दंड ठोठावला आहे. या निर्णयामुळे महिलांवरील अत्याचारांविरोधात न्यायप्रणालीने कठोर संदेश दिला आहे.
घटनेचा तपशील असा
२७ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील भावे शिवार (धाये पिंप्री-नायगाव रोड) येथील रविंद्र भास्कर पोहेकर यांच्या शेत गट नं. २३०/१ मधील विहीरीत ही घटना घडली. आरोपी आणि मयत महिला यांच्यात मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मयत महिलेने आरोपीकडे वारंवार लग्नाचा आग्रह धरला होता. यामुळे संतापलेल्या आरोपीने तिला प्रथम सैलानी येथे नेले आणि नंतर पोहेकर यांच्या शेतातील विहीरीवर आणले.
तेथे सकाळपासून दुपारपर्यंत दोघे बसून होते. त्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात महिलेचा गळा पकडून तिला विहीरीत ढकलले. महिला विहीरीतून बाहेर येऊ नये म्हणून आरोपीने पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटार पंपाच्या वायर आणि पाईपला विळ्याच्या साहाय्याने कापून विहीरीत टाकले आणि तिला पाण्यात बुडवून ठार मारले. महिला इलेक्ट्रिक मोटारीच्या पाईप आणि वायरला धरून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असतानाच हे कृत्य घडलेलं होतं.
गुन्हा नोंद आणि तपास
मयत महिलेचा भाऊ शे. फरीद शे. मुसा (रा. बडनेर भोलजी, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०२ अन्वये २८ मार्च २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप कारभारी शेवाळे आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर यांनी केला. तत्कालीन पोलीस निरीक्षक मोहिते यांनी खटल्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
न्यायालयीन कारवाई अशी ….
दोषारोप दाखल झाल्यानंतर खटला भुसावळ सत्र न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यात फिर्यादी शे. फरीद शे. मुसा, मयताची बहीण हसीनाबी शेख, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुरज मराठे (ज्याने आरोपी आणि मयत महिलेला सकाळी व दुपारी विहीरीवर पाहिले), सरकारी पंच अब्दुल रफीक अब्दुल मजीद, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ए. पाटील तसेच मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), एसडीआर, ग्राहक अर्ज, टॉवर लोकेशन तपासणारे नोडल अधिकारी मंदार भूपेंद्र गोडवे आणि फ्रान्सिस परेरा (भारती एअरटेल आणि रिलायन्स जीओ कंपनीचे) यांच्या साक्षी व पुरावे निर्णायक ठरले. नोडल अधिकाऱ्यांनी भारतीय पुरावा कायदा कलम ६५बी अन्वये दिलेले प्रमाणपत्रही गुन्हा सिद्ध करण्यास महत्त्वपूर्ण ठरले.
अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मोहन डी. देशपांडे यांनी सरकार पक्षाचा प्रभावी युक्तिवाद सादर केला. त्यांच्या युक्तिवादाचा स्वीकार करून सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी आरोपीला जन्मठेप आणि ₹५,००० दंडाची शिक्षा सुनावली. गेल्या पंधरवड्यात एका मुलाने वडिलांच्या खुनाच्या खटल्यात त्यांच्या मुलाला (आरोपीला ) याच न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यामध्ये देखील अतिरिक्त शासकीय अभियोग्यता मोहन देशपांडे यांनी सरकारी पक्षाचा प्रभावी युक्तिवाद सादर केला होता.

आजच्या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस शिपाई कांतीलाल कोळी आणि ज्ञानेश्वर चौधरी यांनी मदत केली.
हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असल्याने मोबाईल सीडीआर, लोकेशन आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष यात निर्णायक ठरली. या निकालाने लिव्ह-इन रिलेशनशिपमधील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचारांविरोधात न्यायालयाने न्यायदानासाठी ठोस पावले उचलली असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button