Advertisement
अर्थकारणक्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

जळगावात PWD शाखा अभियंत्याला ५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले, अजून एक मोठा मासा अडकण्याची शक्यता

१८ लाखांची लाच मागितल्याची माहिती

जळगाव, दि. ९ मे २०२६ — जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता (वर्ग-२) योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) याला ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली असून, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अजून एक बडा मासा अडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तर या लाचखोर अभियंत्याची चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग देखील लाचखोरीमध्ये मागे नसून, लाखो रुपयांचा गलेलठ्ठ पगार घेणारे अभियंते बिनधास्तपणे तब्बल २०% लाखो रुपयांची लाच स्वीकारत असल्याने यातील अधिकारी निर्लज्जपणे रक्कम स्वीकारत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार हे एक कंत्राटदार असून त्यांनी जळगाव शहरातील वॉर्ड क्रमांक १४, विनोबा नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम केले होते. या कामाची एकूण किंमत ८० लाख ३९ हजार ७४२ रुपये इतकी होती. हे काम वर्ष २०२४ मध्ये मंजूर झाले होते. तक्रारदाराने काम पूर्ण केल्यानंतर त्यापैकी सुमारे ४२ लाख रुपये ऑक्टोबर २०२५ मध्ये प्राप्त झाले होते, तर उर्वरित ३८ लाख ४९ हजार ७४२ रुपयांचे बिल प्रलंबित होते. हे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी तक्रारदाराने शाखा अभियंता योगेश अहिरे यांच्याकडे पाठपुरावा केला असता, त्यांनी पूर्वीचे बिल मंजूर करून दिल्याचा मोबदला आणि उर्वरित बिल मंजुरीसाठी तब्बल १८ लाख रुपयांची लाच मागितली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग देखील लाचखोरी मध्ये मागे नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
तडजोडीनंतर १५ लाखांची मागणी
तक्रारदाराने नकार दिल्यानंतर रकमेबाबत तडजोड करण्यात आली आणि १५ लाख रुपये देण्याचे ठरले.
यातील — ७.५० लाख रुपये स्वतःसाठी
७.५० लाख रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी
अशी विभागणी करून लाचेची मागणी करण्यात आली होती. यातील पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये तत्काळ, तर उर्वरित १० लाख रुपये बिल मंजूर झाल्यानंतर स्वीकारण्याचे नियोजन निश्चित झाले होते.
एसीबीकडे तक्रार आणि सापळा
तक्रारदाराने ५ मे २०२६ रोजी एसीबी जळगावकडे लेखी तक्रार दाखल केली. एसीबीने पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ९ मे रोजी सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे ५ लाख रुपये दिले असता, योगेश अहिरे यांनी ती रक्कम त्यांच्या एमएच-१९ सीव्ही-२६१९ क्रमांकाच्या कारमधील समोरील सीटखाली ठेवण्यास सांगितले. रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
आणखी गंभीर आरोप
एसीबीच्या तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. अहिरे यांनी एकूण बिलाच्या ६ टक्के रक्कम नगरसेविकेच्या मुलाला देण्यासाठी तक्रारदाराला प्रवृत्त केल्याचेही प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कोणत्या कलमान्वये गुन्हा?
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७, ७अ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई करणारे अधिकारी
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांनी काम पाहिले. यापथकात हेमंत नागरे, सुरेश पाटील, संगीता पवार, बाळू मराठे, प्रदीप पाटील, भूषण पाटील यांचा सहभाग होता.
नागरिकांना एसीबीचे आवाहन
कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्यास किंवा भ्रष्टाचारासंदर्भात माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : टोल फ्री: १०६४
दूरध्वनी: ०२५७-२२३५४७७
ई-मेल: dyspacbjalgaon@gmail.com
या कारवाईमुळे जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp