Advertisement
आरोग्यक्राईम/कोर्टजळगावमुंबईराजकीय

तारकेश झोपे मृत्यू प्रकरणात नगरपरिषद आरोग्य अभियंता, मुख्याधिकारी यांच्यावर गंभीर आरोप,…तर तारकेशचा जीव वाचला असता- लक्ष्मण चावरेंचा दावा

नागरिकांच्या तक्रारींकडे आरोग्य अभियंत्यांनी केले दुर्लक्ष

भुसावळ, दि. 18 मे 2026 — भुसावळातील नऊ वर्षीय तारकेश झोपे या चिमुकल्याच्या कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर झालेल्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येत असून, संपूर्ण प्रकरणात भुसावळ नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक लक्ष्मण चावरे यांनी थेट पाणीपुरवठा व आरोग्य अभियंता दीपक चौधरी यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप करत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधासह गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
वेळीच कारवाई झाली असती तर तारकेशचा जीव वाचला असता- लक्ष्मण चावरेंचा दावा ”
२४ एप्रिल रोजी नारायण नगर परिसरातील तारकेश झोपे या शाळकरी मुलावर कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याच्या शरीरावर तब्बल ३० टाके पडले होते. त्यानंतर रेबीजची लागण झाल्याने मुंबई येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक नसून नगरपरिषदेच्या निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभारामुळे झालेला “प्रशासकीय खून” असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.
मोहित नगर परिसरातील रहिवाशांनी यापूर्वीच प्रकाश कोळी यांच्या कुत्र्यांबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. संबंधित कुत्र्यांचे लसीकरण, नोंदणी आणि नियंत्रणासाठी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आरोग्य विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. घरात सात कुत्रे असल्याबाबत कोणतीही नोटीसही बजावण्यात आली नव्हती. “जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली असती तर निष्पाप तारकेशचा जीव गेला नसता,” अशी माहिती आरोग्य निरीक्षक लक्ष्मण चावरे यांनी दिली आहे.
५० लाखांची निविदा, पण कामच सुरू झाले नाही
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या निर्देशांनुसार २९ ऑक्टोबर २०२५ रोजी अंदाजे ५० लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. ही निविदा परभणी येथील “राधाकृष्ण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था” या संस्थेला देण्यात आली होती. त्यासाठी कार्यादेश आरोग्य अभियंता दीपक चौधरी यांनी जारी केला होता.
मात्र, संबंधित संस्थेने प्रत्यक्षात कामच सुरू केले नाही. अशा परिस्थितीत त्यांचे कंत्राट रद्द करून नवीन संस्थेला काम देणे आवश्यक होते. परंतु, नगरपरिषदेने फेरनिविदा न काढता संपूर्ण प्रक्रिया थंडबस्त्यात टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य अभियंता दीपक चौधरी यांनी कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचा आरोप आता अधिक तीव्र झाला आहे.
फोन बंद करून सुट्टी घेतली की फरार झाले?”
आरोग्य निरीक्षक लक्ष्मण चावरे यांनी आणखी एक गंभीर आरोप करत सांगितले की, कुत्रे पकडण्याच्या कारवाईनंतर आरोग्य अभियंता दीपक चौधरी यांनी मोबाईल फोन बंद केला आणि ते संपर्काबाहेर गेले. “ते सुट्टीवर गेले होते की फरार झाले होते, याची चौकशी झाली पाहिजे. काहीतरी चिरीमिरी मिळत असल्यामुळेच त्यांनी जबाबदारी झटकली का ?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पत्रकारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दीपक चौधरी यांचा मोबाईल फोन बंद असल्याचे आढळून आले.
लेखी आदेश नसताना कुत्रे जप्त
तारकेश झोपेच्या मृत्यूनंतर शहरात संतप्त वातावरण निर्माण झाले होते. जनक्षोभ वाढू नये म्हणून आरोग्य निरीक्षक लक्ष्मण चावरे यांनी मुख्याधिकारी किंवा विभागप्रमुखांचा कोणताही लेखी आदेश नसतानाही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह प्रकाश कोळी यांच्या घराची झडती घेतली. या कारवाईत पाच कुत्रे पकडून डॉग व्हॅनमधून नेण्यात आले.
जप्त कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू; पुरावे नष्ट केल्याचा आरोप
या प्रकरणाला नंतर आणखी गंभीर वळण मिळाले. जप्त करण्यात आलेल्या कुत्र्यांपैकी तीन कुत्र्यांचा मध्यरात्री संशयास्पद मृत्यू झाला. मृत कुत्र्यांचे शव सडू लागल्याने दुर्गंधी पसरत होती. वरिष्ठ अधिकारी संपर्काबाहेर असल्याने आरोग्य निरीक्षकांनी पुढाकार घेत शहराबाहेर त्या कुत्र्यांना दफन केल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, मृत कुत्र्यांचे शवविच्छेदन न करता आणि कोणतीही अधिकृत वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण न करता त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप झाला आहे. कुत्र्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला की इतर कोणत्या कारणामुळे, याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल नगरपरिषदेला प्राप्त झाला असला तरी संपूर्ण प्रक्रियेवर संशय व्यक्त होत आहे.
भारतीय न्याय संहितेच्या कलम २३८ अंतर्गत “पुरावे नष्ट करणे” हा गुन्हा लागू होऊ शकतो, अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे. नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, या प्रकरणात पुरावे दडपण्याचा प्रयत्न झाला असून जबाबदार अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
प्रभारी मुख्याधिकारीही निशाण्यावर
भुसावळ नगरपरिषदेला नियमित मुख्याधिकारी नसून एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. मात्र, ते अनेक दिवस भुसावळ नगरपरिषदेत हजर नसल्याचे सांगितले जात आहे. एरंडोल येथील पोटनिवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने ‘अ’ वर्ग नगरपरिषदेचा कारभार अक्षरशः रामभरोसे सुरू असल्याची टीका होत आहे.
प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदन; जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
सोमवारी संतप्त नागरिकांनी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्य अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झोपे कुटुंबाचा “वंशाचा दिवा” विझल्याचे नमूद करत पीडित कुटुंबाला तत्काळ पाच लाखांची आर्थिक मदत आणि सानुग्रह अनुदान देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या अशा…
◾आरोग्य अभियंता दीपक चौधरी आणि प्रभारी मुख्याधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन
◾संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे
◾पुरावे नष्ट केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदवणे
आरोग्य विभागातील जबाबदार अधिकारी आणि ◾कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी
◾पीडित झोपे कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करणे
◾साक्षीदारांना धमकावणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई करणे
आंदोलनाचा इशारा
या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक आणि नागरिकांनी दिला आहे.
प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देताना डॉ. नितू पाटील, रजनी सावकारे, नगरसेवक युवराज लोणारी, रूपेश देशमुख, राजेंद्र नाटेकर, विशाल नाटेकर,संदीप सुरवाडे, नगरसेविका प्राची उदय पाटील, श्रेयस इंगळे, सतीश सपकाळे, सोनम इंगळे, भूषण महाजन, पवन बुंदेले, यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp