भुसावळ जिल्हा दृष्टीपथात ? जळगाव सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभागाचे कार्यालय भुसावळ येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय जारी
यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोल्ड आणि जामनेर तालुके जोडले जाणार

जळगाव, २५ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्र शासनाने जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभागाचे कार्यालय भुसावळ येथे स्थलांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे भुसावळ, यावल, रावेर आदी तालुक्यांतील नागरिकांना जळगावपर्यंत जाण्याचा त्रास वाचेल, तसेच प्रशासकीय कामांना गती मिळेल. हे कार्यालय आता ‘कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग, भुसावळ’ या नावाने ओळखले जाईल.
हा निर्णय भुसावळच्या जिल्हा होण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. स्थानिक पातळीवर सेवा उपलब्ध झाल्याने रस्ते, पूल, इमारतींच्या कामांशी संबंधित तक्रारी आणि परवानग्यांसाठी नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचेल. शासनाने स्पष्ट केले आहे की, हे स्थलांतर मंजूर पदांसह होणार असून, यामुळे कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही.
स्थानिक कंत्राटदार, पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. “भुसावळमध्येच कार्यालय सुरू होणार असल्याने नागरिकांचा त्रास कमी होईल आणि कामे जलद होतील.” प्रशासकीय दृष्टिकोनातूनही क्षेत्रीय कामांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे सोपे होईल.
लवकरच कार्यालय हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होईल. हा निर्णय नागरिकांच्या सोयी आणि प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, तसेच भुसावळच्या विकासाला चालना देईल.
भुसावळ जिल्ह्यासाठी अनुकूल कार्यालये
यापूर्वीच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, ग्रामीण रुग्णालय तथा ट्रामा केअर सेंटर या कार्यालयांच्या सुसज्ज इमारती कार्यान्वित झालेल्या असून आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला भुसावळ येथे स्थलांतरित करण्यात येत आहेत.त्यामुळे भुसावळची वाटचाल आता जिल्हा होण्याच्या दृष्टीने अनुकूल असल्याचे संकेत मिळालेले आहेत.













