‘हप्ते देऊन बुक्क्यांचा मार ‘,सात लाखांचा झोल,API च्या अंगलट, नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली, नेमकं प्रकरण काय ?
भुसावळ दि-30/09/2024, भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशनचे वादग्रस्त माजी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची दिनांक 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. त्यांच्या विरोधात पोलीस कर्मचाऱ्यांसह वरणगाव परिसरातून अनेक तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाखल करण्यात आलेल्या होत्या. मात्र त्या बाबत योग्य ती चौकशी किंवा निश्चित कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाप्रती नाराजीची भावना निर्माण होऊन पोलीस प्रशासनाची बदनामी होत होती.
मात्र अशाच एका वादग्रस्त प्रकरणामुळे शेवटी एपीआय भरत चौधरी यांची आता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दखल घेत त्यांना तात्काळ नियंत्रण कक्षात जमा केलेले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वरणगाव येथील एका ट्रक चालकाने काही महिन्यांपूर्वी एक ट्रक फायनान्स कंपनीकडून मासिक हप्त्यांच्या योजनेअंतर्गत घेतलेला होता.मात्र हवे तसे उत्पन्न होत नसल्याने कर्जाचे थकलेले होते. तसेच कर्जबाजारीपणा सुद्धा वाढला होता .यातून त्याने अनोखी शक्कल लढवली होती, त्याने वरणगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन एपीआय भरत चौधरी यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीशी संपर्क करून आपण आपला ट्रक विकून त्याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात चोरीचा खोटा गुन्हा दाखल करून त्यातील काही रक्कम ही एपीआय भरत चौधरी यांना देण्यासाठी तोंडी ठराव करण्यात आला होता. या ठरावाला API भरत चौधरी यांनी संमती दिली होती. सदरील बैठकी ही वरणगाव परिसरातील एका ढाब्यावर झाल्याचे बोलले जात आहे. ठरलेल्या योजनेनुसार सदरील ट्रक नियमबाह्य आणि बेकायदेशीर पद्धतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे एका व्यक्तीला विकण्यात आला होता. आणि तो ट्रक चोरी झाल्याच्या खोट्या गुन्ह्याची नोंद तत्कालीन एपीआय भरत चौधरी यांच्या आदेशावरून वरणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
मात्र ज्या व्यक्तीने ट्रक विकत घेतला त्याने तो ट्रक नावावर करण्यासाठी उपप्रादेशिक कार्यालय, जळगाव येथे प्रकरण दाखल केले असता, प्राथमिक चौकशी ट्रकची ती कागदपत्रे बनावट असल्याचे सिद्ध झालं. त्यामुळे सदरील ट्रक घेणाऱ्या व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली होती. त्यासाठी त्याने ज्या व्यक्तीकडून विकत घेतला त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. शेवटी यात एपीआय भरत चौधरी यांच्या एका जवळच्या विश्वासू व्यक्तीने उडी घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र फसवणूक झालेल्या व्यक्तीने आपल्याला ट्रक नकोच सर्व पैसे परत पाहिजे म्हणून तगादा लावला होता.
शेवटी त्या फसवणूक झालेल्या व्यक्तीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार केलेली होती. पोलीस अधीक्षकांनी सदरील ट्रक विकणाऱ्या व्यक्तीची जळगाव येथे चौकशी केली असता त्याने एपीआय भरत चौधरी यांच्याशी संगनमत करून सात लाखात ट्रक विक्री केल्यानंतर ती रक्कम दोघांनी परस्पर आपसात वाटून घेतल्याचे सांगितले. असा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने त्याची दखल घेऊन एपीआय भरत चौधरी यांना तात्काळ जळगाव येथील नियंत्रण कक्षात जमा करण्यात आलेले आहे.
अवैध धंद्यावाल्यांना दमदाटी
वरणगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध धंदेवाल्यांकडून दरमहा सट्टा-पत्ता यांच्या पेढी मालकांकडून विशिष्ट रकमेचा हप्ता दिला जात असतानाही, त्यांना एपीआय भरत चौधरी यांच्याकडून वारंवार दमदाटी आणि मारहाण करण्याचे प्रकार समोर आलेले होते. या घटनांची वरणगाव परिसरात दबक्या आवाजात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. एक प्रकारे अवैध धंदे वाल्यांना ‘हप्ता देऊन बुक्क्यांचा मार‘ सहन करावा लागत होता. मात्र आता एपीआय भरत चौधरी यांची बदली झाल्याने अवैध धंदेवाल्यांनी सुटकेचा निःश्वास टाकलेला आहे.