Advertisement
अर्थकारणक्राईम/कोर्टजळगावमुंबई

भुसावळ शहरातील जामनेर रोडच्या अपूर्ण व निकृष्ट काँक्रिटीकरणामुळे खड्डे,अपघाताचा धोका वाढला; खड्ड्यांना डांबराचे ठिगळ लावण्याचे काम सुरू

दर्जेदार कामाची नागरिकांची मागणी

भुसावळ, दि-16/02/2026, शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या जामनेर रोडवरील चौपदरीकरण व काँक्रिटीकरणाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहे. सीआरएफ (Central Road Fund) व हायब्रीड अॅन्युइटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या या कामामुळे नागरिकांना एकेरी मार्गावरून वाहतुक करावी लागत आहे. यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रकल्पांतर्गत नाहाटा चौफुली ते जामनेर शहर या मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण होत आहे. विशेषतः भुसावळ शहरातील गजानन महाराज मंदिर ते चोरवड गावापर्यंतचा भाग (राज्य सीमा विटवा-भुसावळ-जामनेर मार्गाचा ४४/५०० ते ५८/१०० हा विभाग) चौपदरीकरण व काँक्रिटीकरणासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच यावल रोड, गांधी पुतळा ते गजानन महाराज मंदिरापर्यंतचा भाग (४५/२०० ते ७५/५००) यासाठी १८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.

कामाला सुरुवात झाली असून, जामनेर रोडवरील पूर्वीच्या काँक्रीट रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र गजानन महाराज मंदिर ते चोरवडपर्यंतचा भाग अपूर्ण राहिला आहे. रस्त्याची एक बाजू पूर्ण न झाल्याने वाहतुक एका बाजूने चालवावी लागत आहे. यामुळे धूळ उडते, विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा त्रास होतो. रस्त्याच्या अपूर्ण अवस्थेमुळे वाहनांच्या हालचालींमध्ये अडथळे येतात आणि अपघाताचे धोके वाढले आहेत.

डांबराचे ठिगळ लावणे सुरू

याशिवाय, दोन महिन्यांपूर्वी साईबाबा मंदिरासमोरून जाणाऱ्या या रस्त्याच्या काही भागाचे पुन्हा काँक्रिटीकरण करण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने ते काम लवकरच खराब होऊ लागले आहे. आता खडी बाहेर पडू लागली असून, त्यावर डांबराचे ठिगळ लावण्याचे काम सुरू झाले आहे. या निकृष्ट कामामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी या कामाची योग्य चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

परिसरातील नागरिकांनी सांगितले की, “रस्त्याचे काम इतक्या संथ गतीने सुरू आहे की, दैनंदिन वाहतुकीतून होणारा त्रास सहन करण्यापलीकडे पर्याय उरला नाही. निकृष्ट कामामुळे जनतेचे पैसे पाण्यात गेले आहेत. प्रशासनाने तातडीने काम पुन्हा सुरू करावे आणि गुणवत्तेची काटेकोर तपासणी करावी.”

या संपूर्ण प्रकरणावर स्थानिक प्रशासन व संबंधित यंत्रणेकडून काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास भुसावळ ते जामनेर या मार्गावरील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटेल, अशी अपेक्षा आहे. मात्र सध्या ठप्प काम आणि निकृष्ट दर्जामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button