अवैध सावकारी प्रकरणात ५ लाखांच्या लाचेपैकी दिड लाखांचा पहिला हप्ता घेताना उपनिबंधक जाळ्यात,

जळगाव, दि. २० मे २०२६ — जळगाव जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत सहकारी संस्थांचे उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी आणि त्यांचा खासगी साथीदार देविदास धनसिंग पाटील यांना १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे सहकार विभागात मोठी खळबळ उडाली असून, सरकारी यंत्रणेमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जगदीश बारी (वय ५६) हे जळगाव येथील सहकारी संस्थांचे उपनिबंधक (वर्ग-१ अधिकारी) म्हणून कार्यरत आहेत. तर दुसरा आरोपी देविदास धनसिंग पाटील (वय ४४) हा जळगाव जिल्हा बँक असोसिएशनमध्ये मानद कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्याला या प्रकरणात खासगी व्यक्ती म्हणून आरोपी करण्यात आले आहे.
तक्रारदाराविरोधात अवैध सावकारी संदर्भात चौकशी सुरू होती. या चौकशीचा अहवाल अनुकूल पाठवण्यासाठी तसेच तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी आरोपी उपनिबंधकाने सुरुवातीला तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. नंतर ही रक्कम तडजोडीअंती ३ लाख रुपयांवर आणण्यात आली.
तक्रारदाराने याबाबत १८ मे २०२६ रोजी एसीबी जळगावकडे तक्रार दिल्यानंतर विभागाने पडताळणी कारवाई केली. या पडताळणीत आरोपी जगदीश बारी यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने सापळा रचण्यात आला.
विशेष म्हणजे, आरोपी अधिकाऱ्याने तक्रारदाराला “पूर्वी वकिलामार्फत तक्रार दिल्याने आम्हाला मोठा त्रास झाला होता, त्यामुळे आधी नकारात्मक अहवाल दिला होता; मात्र आता अनुकूल अहवाल पाठवतो,” असे सांगून पैशांची मागणी केल्याचेही एसीबीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
एसीबीने २० मे रोजी सापळा राबवला असता, आरोपींच्या सांगण्यानुसार पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपये देविदास पाटील याच्याकडे देण्यात आले. ही रक्कम स्वीकारताना जळगाव येथील जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनच्या कार्यालयात त्याला रंगेहात पकडण्यात आले. एसीबीने लाचेची संपूर्ण रक्कम जप्त केली आहे.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई एसीबी जळगावचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले. तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्याकडे देण्यात आली आहे.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ एसीबीशी संपर्क साधावा. विभागाने ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.













