भुसावळ येथील २५.४२ लाखांच्या लुटीचा छडा लागला; कंपनी ड्रायव्हरच निघाला ‘मास्टरमाइंड’, ६ जणांना अटक,

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील खडके शिवारात घडलेल्या २५.४२ लाख रुपयांच्या दरोड्याच्या गुन्ह्याचा (क्र. २०७/२०२५) अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी पर्दाफाश केला. फिर्यादीच्या रॉयल कंपनीतील ड्रायव्हर शाहीद बेग हाच या कटाचा मास्टरमाइंड असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी शाहीदसह एकूण ६ आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून २३.४२ लाख रुपये रोख आणि ३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

घटनेचा थरारक तपशील
२८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १०.२० वाजता फिर्यादी मोहम्मद यासीन ईस्माइल (रॉयल कंपनी कर्मचारी) हे कंपनीच्या २५.४२ लाख रुपयांची बॅग मोटारसायकलवर (क्र. MH-19-BC-5586) घेऊन घरी परतत होते. खडके शिवारातील सत्यसाईनगराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर तीन अज्ञात इसमांनी चालत्या दुचाकीला धडक दिली. फिर्यादीचा तोल ढिला झाल्याबरोबर आरोपींनी पेट्रोल टाकीवरील पैशांची बॅग हिसकावून मोटारसायकलवरून फरार झाले.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवला होता. तपासात संगनमताचा कट समोर आल्याने कलम ३१० (२) (दरोडा) वाढीव करण्यात आले.
तपासाची कुशलता आणि गुन्ह्याची उकल
घटनेच्या गांभीर्याची जाणीव ठेवून पोलिसांनी त्वरित तपास यंत्रणा कार्यान्वित केली. फिर्यादीचा ड्रायव्हर शाहीद बेग याच्यावर संशय घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची रचना केल्याची कबुली दिली.
शाहीद बेगने पैशांच्या हालचालीची अचूक वेळ आणि मार्गाची माहितीची टिप दिली. नंतर शाहीदने साथीदार मुजाहीद मलीक आणि मोहम्मद दानिश यांना योजना सांगितली. मुजाहीदने रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अजहर फरीद मलक, अमीर खान युनुस खान आणि इजहार वेग इरफान वेग यांना पाचारण करून लूट अंमलात आणली.
अटकेतील आरोपी (३०ऑक्टोबर २०२५)
1. शाहीद वेग इब्राहिम बेग (वय २५, भुसावळ) – मुख्य सूत्रधार व कंपनी ड्रायव्हर.
2. मुजाहिद आसीफ मलीक(वय २०, भुसावळ) – कट रचणारा.
3. मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (वय १९, भुसावळ) कट रचणारा.
4. अजहर फरीद मलक(वय २४, रसलपूर, रावेर) – लुटीतील सक्रिय सहभागी.
5.अमीर खान युनुस खान (वय २४, रसलपूर, रावेर) – लुटीतील सक्रिय सहभागी.
6. इजहार वेग इरफान वेग (वय २३, रसलपूर, रावेर) – लुटीतील सक्रिय सहभागी.
जप्त साहित्य व पुढील तपास
जप्त रक्कम : २३,४२,००० रुपये रोख आणि उर्वरित : २ लाख रुपये आणि लुटीत वापरलेली मोटारसायकल जप्त करणे बाकी आहे.
सर्व आरोपींना न्यायालयाने ३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड (भुसावळ तालुका) यांच्या नेतृत्वात सुरू आहे.
सदरील घटनेचा तपास हा भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड , राहुल वाघ (भुसावळ बाजारपेठ) आणि महेश गायकवाड (भुसावळ तालुका) यांच्या नेतृत्वाखाली श्रे.पो.उप.नि. रवी नरवाडे ,पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, प्रेमचंद सपकाळे ,पो.ना. श्रीकृष्ण देशमुख, विकास सातदिवे ,पो.कॉ. प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, ईश्वर पाटील ,चापोहेकॉ दर्शन ढाकणे (स्था.गु.शा. जळगांव) ,पुजा अंधारे, संजय तायडे, वाल्मीक सोनवणे, सुधीर विसपुते, जितु ठाकरे (भुसावळ तालुका) ,योगेश माळी, भूषण चौधरी, अमर अढाळे, प्रशांत सोनार (भुसावळ बाजारपेठ) प्रमोद पाटील (रावेर पो.स्टे.) यांच्या पथकाने ही कामगिरी केली.













