भुसावल वीजनिर्मिती केंद्राचे माजी मुख्य अभियंता राजेंद्र बाविस्कर यांना चेन्नई येथे मानद डॉक्टरेट (Ph.D.) बहाल

भुसावल :महाराष्ट्र राज्य वीज मंडळात (आता महावितरण) दीर्घकाळ प्रशासकीय व तांत्रिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे भुसावल जवळील दिपनगर थर्मल पावर स्टेशनचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता राजेंद्र रामचंद्र बाविस्कर (वय ७२) यांना चेन्नई येथील प्रतिष्ठित ‘साउथ वेस्टर्न युनिव्हर्सिटी’ने प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल ‘मानद पीएचडी – डॉक्टरेट इन ऍडमिनिस्ट्रेशन’ ही पदवी प्रदान करून गौरविले आहे.
चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या विशेष दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू तथा मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. बाविस्कर यांच्या हस्ते ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. प्रशासकीय कुशलता, सामाजिक बांधिलकी, ज्येष्ठ नागरिक व कामगार चळवळीतील सक्रिय सहभाग तसेच सतत वाचन व अध्ययनाचा व्यासंग या गुणांच्या आधारेच विद्यापीठाने त्यांना हा सन्मान दिला आहे.
श्री. बाविस्कर यांनी १९७६ मध्ये महाराष्ट्र राज्य वीज मंडळात सहाय्यक अभियंता म्हणून सेवेला प्रारंभ केला. नंतर उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता अशी पदोन्नती घेत भुसावल दिपनगर थर्मल पावर स्टेशनचे मुख्य अभियंता म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आणि तेथूनच २०१३ मध्ये सेवानिवृत्त झाले. वीज निर्मिती, देखभाल-दुरुस्ती आणि प्रशासकीय कामकाजात त्यांनी नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली.
सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक क्षेत्रात अतिशय सक्रिय आहेत. ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध सेवाभावी संस्था, कामगार संघटना, सहकारी पतपेढ्या, मंदिर ट्रस्ट अशा अनेक संस्थांमध्ये ते महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या या सर्वंकष योगदानाची दखल घेऊन साउथ वेस्टर्न युनिव्हर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केले.
या सन्मानाबद्दल भुसावलसह जळगाव, धुळे, नाशिक परिसरातील अनेक सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध कामगार संघटना, सहकारी संस्था तसेच मित्रपरिवाराने डॉ. राजेंद्र बाविस्कर यांचे जल्लोषाने अभिनंदन केले आहे. भुसावल थर्मल पावर स्टेशनचे विद्यमान अधिकारी-कर्मचारी तसेच सेवानिवृत्त सहकाऱ्यांनीही त्यांच्या या यशाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. राजेंद्र बाविस्कर यांनी अभिनंदन करणाऱ्या सर्वांना धन्यवाद देताना सांगितले की, “हा सन्मान माझ्या वैयक्तिक यशापेक्षा माझ्या सहकाऱ्यांच्या साथीचा आणि कुटुंबाच्या पाठिंब्याचा परिपाक आहे. उर्वरित आयुष्य मी समाजहितासाठीच वेचीन.” भुसावलकरांसाठी हा अभिमानास्पद क्षण मानला जात आहे.












