
जळगाव/भुसावळ, ११ मे २०२६ : भुसावळ नगरपरिषदेच्या थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा श्रीमती गायत्री रुपचंद गौर ऊर्फ गायत्री चेतन भंगाळे यांची निवड महाराष्ट्र शासनाने रद्द केल्याने शहरासह जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. अनुसूचित जाती (SC) आरक्षणावर निवडून आलेल्या भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समिती, जळगाव यांनी अवैध ठरवल्यानंतर शासनाने हा निर्णय घेतला होता. शासनाच्या नगर विकास विभागाकडून आदेश क्रमांक एमयुएम-२०२६/प्र.क्र.१८७/नवि-१७, दिनांक ४ मे २०२६ रोजी जारी करण्यात आला होता. या आदेशानुसार, जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे भंगाळे यांची नगरसेवक तसेच नगराध्यक्षा म्हणून निवड २३ एप्रिल २०२६ पासून भूतलक्षी प्रभावाने रद्दबातल करण्यात आली आहे. संबंधित कारवाई महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १६ (१क) व (१ब) तसेच २००० च्या जाती प्रमाणपत्र पडताळणी अधिनियमातील कलम ६(१) अंतर्गत करण्यात आली आहे.
दरम्यान, भंगाळे यांनी जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका खंडपीठाने गेल्या आठवड्यात फेटाळल्याने त्यांना दिलासा मिळाला नाही. याप्रकरणी पुढील सुनावणी १४ जुलै रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निर्णयामुळे भुसावळ नगरपरिषदेतील सत्तासमीकरणांमध्ये आता मोठा बदल झाला आहे. नगराध्यक्ष पद रिक्त झाल्याने तात्पुरत्या स्वरूपात उपनगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून आज पदभार सोपवला गेला आहे. पुढील काळात राजकीय घडामोडी, सत्तासमीकरणात तात्पुरता बदल झाला आहे. तसेच प्रशासकीय व्यवस्था याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. नगरपषदेत आधीच भाजपचे संख्याबळ जास्त आहे. आजची घटना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्या गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी कायम मौन बाळगले आहे. सत्ता स्थापनेपासून त्यांनी स्थानिक नगरपालिकेतील घडामोडींवर कोणतेही सार्वजनिक भाष्य केलेले नाही. तसेच माजी आमदार संतोष चौधरी व त्यांच्या समर्थकांपासूनही त्यांनी अंतर राखल्याचे दिसून आले आहे. खडसे यांच्या या भूमिकेमुळे भविष्यात पोटनिवडणुक झाल्यास त्या संभाव्य पोटनिवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणूकीत एकनाथ खडसे यांनी उघडपणे भाजपचा प्रचार करून मते मागितल्याचे आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले होते. तर दुसरीकडे भुसावळ शहरात खडसेंचा प्रभावी मतदारवर्ग असल्याने त्यांचा कल यापुढे कोणत्या पक्षाकडे झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













