Advertisement
अर्थकारणक्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

अवैध सावकारी प्रकरणात उपनिबंधकाच्या भुसावळ कॉसमॉस बँकेच्या लॉकरमधून 1.7 कोटींचे सोन्याचांदीचे घबाड एसीबीने केले जप्त

जिल्ह्यातील आतापर्यंतचं सर्वात मोठं घबाड जप्त

जळगाव : सहकार विभागातील भ्रष्टाचाराचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत सहकारी संस्थांचे उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी यांना १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्या लॉकरमधून तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सहकार विभागात एकच खळबळ उडाली असून, अधिकाऱ्यांकडे पगारापेक्षा कित्येक पटीने अधिक भ्रष्टाचारातून साठवलेल्या बेहिशेबी संपत्तीबाबत जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यात अवैध सावकार आणि बुडालेल्या पतपेढ्यांच्या संचालकांकडून बचावासाठी मिळालेल्या बेकायदेशीर उत्पन्नाचा समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जगदीश बाबुराव बारी (वय ५६) हे जळगाव येथे सहकारी संस्थांचे उपनिबंधक (वर्ग-१ अधिकारी) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात देविदास धनसिंग पाटील (वय ४४), मानद कार्यकारी अधिकारी, जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन, जळगाव यालाही खासगी व्यक्ती म्हणून आरोपी करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरोधात अवैध सावकारी संदर्भात चौकशी सुरू होती. या चौकशीचा अहवाल अनुकूल पाठवण्यासाठी तसेच तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी आरोपी उपनिबंधक जगदीश बारी यांनी सुरुवातीला तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. नंतर तडजोडीनंतर ही रक्कम ३ लाख रुपयांवर निश्चित करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.

तक्रारदाराने १८ मे २०२६ रोजी एसीबी जळगावकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर विभागाने पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, “पूर्वी वकिलामार्फत तक्रार दिल्याने आम्हाला मोठा त्रास झाला होता, त्यामुळे आधी नकारात्मक अहवाल दिला होता; मात्र आता अनुकूल अहवाल पाठवतो,” असे सांगत आरोपी अधिकाऱ्याने पैशांची मागणी केल्याचेही एसीबीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यानंतर २० मे रोजी एसीबीने सापळा रचला. आरोपींच्या सूचनेनुसार पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपये देविदास पाटील याच्याकडे देण्यात आले. जळगाव येथील जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनच्या कार्यालयात ही रक्कम स्वीकारताना देविदास पाटील याला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर उपनिबंधक जगदीश बारी यांनाही अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना २३ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, तपासादरम्यान आरोपी जगदीश बारी यांच्या भुसावळ येथील कॉसमॉस बँकेत लॉकर असल्याची माहिती एसीबीला मिळाली. त्यानंतर पंचांसमक्ष लॉकरची झडती घेण्यात आली असता मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड आढळून आली.

लॉकर झडतीत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे ६६०.३३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगड्या आणि सोन्याची बिस्किटे असून त्यांची किंमत ९९ लाख ४ हजार ९६० रुपये इतकी आहे. याशिवाय सर्व ५०० रुपयांच्या नोटांमध्ये ८ लाख ३६ हजार ५०० रुपयांची रोकड आणि सुमारे ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपये इतकी असल्याचे एसीबीने स्पष्ट केले आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सापळा कारवाईत पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले, तर पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करत आहेत. एसीबीच्या पथकाने अत्यंत गुप्ततेने ही कारवाई पूर्ण केली.

या प्रकरणामुळे सहकार विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती कशी जमा झाली, याबाबत विविध स्तरांवर चर्चा रंगू लागली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ एसीबीकडे तक्रार नोंदवावी.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp